मुंबई -: म्युझिशियन्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवार, दि.23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.00 वा. रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे पहिल्या भारत-चीन संगीत महोत्सवाचे   (इंडिया-चायना म्युझिक फेस्टिवल) आयोजन करण्यात आले आहे. 
  भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व चीनचे पंतप्रधान ह्यू जिनताओ यांनी सन 2012 हे वर्ष भारत-चीन मैत्री वर्ष म्हणून जाहीर केले आहे.  तसेच भारतीय सिनेमाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.  त्यानिमित्त म्युझिशियन्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत हे या महोत्सवाचे अध्यक्ष असून सांस्कृतिक कार्य व पर्यावरण मंत्री संजय देवतळे हे प्रमुख अतिथी आहेत.  चीनचे व्हॉईस कॉन्सुलेट जनरल ली झियांग वाँग यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती राहणार आहे. 
या संगीत महोत्सवात चीनचे 100 नामवंत कलाकार व त्यांचे वाद्यवृंद सहभागी होणार असून चीन आणि भारत या दोन देशांतील संगीत, गायन व वादन यांचा आविष्कार होणार आहे. हा महोत्सव भारत व चीन या दोन देशातील सांस्कृतिक व सहकार्याचे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.  
जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णयुगातील सुपरहिट ठरलेली अनेक गीते चीनमध्ये लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे.  मुकेश, किशोरकुमार, महंमद रफी, आशा भोसले, लता मंगेशकर, हेमंत कुमार हे चीनमध्ये लोकप्रिय आहेत. या संगीत महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील संगीत प्रेमींना चीनी संगीताचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी मिळणार असून यामुळे भारत-चीन मैत्री आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे.  

 
Top