लाहोर - साडेतीन वर्षापूर्वी अजमल कसाबच्या फरीदकोट या गावाकडे जगाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी पाकिस्तान माध्यमांनीही कसाबचे गाव, घर व कुटुंबियांना जगासमोर दाखवले होते. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. पाकिस्तानच्या सरकारने व गुप्तचर संघटनांनी कसाब व त्याच्या कुटुंबियांबाबत अधिक माहिती देण्यावर मर्यादा आणली होती. तेव्हापासून कसाबचे कुटुंब फरीदकोटमधून गायब झाले आहे. ते कोठे राहत आहेत, याबाबत गावांतील लोकांना काहीही माहिती नाही. गावातील लोकांना याबाबत बोलण्याची बंदी घालण्यात आली आहे.
बुधवारी जेव्हा कसाबला पुण्यातील जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानमधील वृत्तपत्र 'डॉन'ने आपला प्रतिनिधी कसाबच्या गावात पाठवला होता. मात्र, कसाबच्या तत्कालीन घरात आता दुसरेच कोणीतरी राहत असल्याचे आढळून आले. याबाबत संबंधित रहिवाशाला विचारले असता, मी येथे गेल्या तीन वर्षापासून भाड्याने राहत असल्याचे त्याने सांगितले. गावातील लोक कसाबबाबत काहीही बोलत नाहीत. अधिक खोलाने विचारल्यास लोक विचारण्यावरच भडकतात. त्याचा आता आमच्या गावाशी काहीही संबंध नाही, असे गावातील ज्येष्ठ लोक बोलत आहेत. तेथील स्थानिक मौलवीने गावक-यांना सांगितले आहे की, कसाबच्या प्रकरणाबाबत सर्वांनी लांब राहावे. म्हणजेच या विषयाबाबत कोणाशीही काहीही बोलू नये.
(छायाचित्रामधील घर हे अजमल कसाबचे आहे. आता या घरात कोणीतरी भाड्याने राहत आहे. त्याचे कुटुंबिय फरीदकोटमधून गायब झाले आहे.)
* सौजन्य दिव्यमराठी