इस्लामाबाद :- भारताने मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला बुधवारी फासावर लटकवल्यानंतर गुरुवारी पाकिस्तानस्थित तालिबानने कसाबच्या मृतदेहाची मागणी केली आहे. जर भारताने कसाबचा मृतदेह दिला नाही तर आम्ही भारतीयांना लक्ष्य करुन मोठा रक्तपात करु, अशी धमकी दिली आहे. 
             तालिबानचा प्रवक्ता इन्साअल्ला एहसान याने अज्ञातस्थळावरुन फोन करुन याबाबतची धमकी दिली आहे. एहसान म्हणाला, अजमल कसाबच्या फाशीचा बदला लवकरच घेतला जाईल. त्यासाठी भारताला लक्ष्य करु. तसेच आम्ही मागणी करीत आहोत की भारताने कसाबचा मृतदेह आमच्या हवाली किंवा त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करावी, अन्यथा भारतीयांना कोठेही (पाकिस्तानसह जगभर) लक्ष्य करुन घातपात करु.  
                  पाकिस्तानमधील तालिबान संघटना अल कायदा या संघटनेशी जवळीक साधून आहे. या पाकिस्तानी तालिबान संघटनेने पाकिस्तानात आतापर्यंत मोठे घातघात घडवून आणले आहेत. तालिबान्यांनी आत्मघाती बनवून अनेक बॉम्बस्फोट घडवले आहेत. यात हजारो लोक ठार झाले आहेत. असे असले तरी पाकस्थित तालिबानला पाकिस्तान सोडून बाहेरच्या देशात मोठे हल्ले करण्यास अद्याप यश मिळाले नाही. 

दूतावासाची सुरक्षा वाढवा - भारताची पाककडे मागणी - दरम्यान, कसाबच्या फाशीनंतर कट्टरवादी लोक याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतील, असे गृहित धरुनच भारताने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी कसाबला फाशी दिल्यानंतर सायंकाळी पाकिस्तान सरकारला पाकमधील भारतीय दूतावासाची सुरक्षा वाढविण्याची सूचना केल्या आहेत. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी याबाबतची माहिती विदेशी पत्रकारांना दिली आहे.
              परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही पाकमधील दूतावासांना अधिक सुरक्षेची गरज असल्याचे म्हटले आहे.  पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा कसाब दहशतवादी होता. पाकमध्ये लष्कर-ए-तोयबा ही संघटना शक्तीशाली संघटना म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतीय दूतावासाला लष्कर लक्ष्य करेल, अशी भीती भारत सरकारला वाटत आहे. मात्र, भारताने संभाव्य धोके लक्षात घेऊन परराष्ट्र व गृह मंत्रालयाने गुप्तचर संघटनांना सूचना केल्या आहेत. 
           केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही देशाच्या सीमा भागांवर, देशातंर्गत हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचे म्हटले  आहे.

* दिव्‍य मराठी

 
Top