
लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी असलेल्या कसाबला मुंबई हल्ला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्जही केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्याला गुप्तपध्दतीने येरवडा तुरुंगात हलविण्यात आले आहे.
एका इंग्रजी दैनिकाने कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आले असल्याचे वृत्त दिले होते. महाराष्ट्रात नागपूर आणि येरवडा या दोनच तुरुंगामध्ये फाशी देण्याची यंत्रणा आहे. त्यामुळेच कसाबला मुंबईच्या अर्थर रोड जेलमधून 19 नोव्हेंबरच्या रात्री येरवड्यात हलवण्यात आले आणि बुधवारी (21 नोव्हेंबर) सकाळी 7.30 वाजता त्याला फाशी देण्यात आली. मुंबईवरील हल्ल्याला येत्या 26 नोव्हेंबर रोजी चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कसाबला दिली गेलेली फाशी भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा असल्याचे विधीतज्ज्ञांनी म्हटले आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 166 लोक मारले गेले. अनेक वरिष्ठ्य पोलिस अधिकारी शहिद झाले होते. या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी कसाब हा मुंबई पोलिसांच्या तावडीत सापडला होता. विशेष न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. यामुळे त्याच्या फीशीच्या शिक्षेतील मोठा अडसरही दूर झाला होता. त्यानंतर अत्यंत गुप्तपद्धतीने कसाबला 19 नोव्हेंबर रोजी येरवडा कारागृहात हलविण्यात आले होते.
* सौजन्य दिव्यमराठी