सोलापूर -: चालु वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने तसेच पाण्याच्या टंचाईमुळे जिल्ह्यातील फळबागा संकटात सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांच्यामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविण्यात येणार आहे.
या योजनेमधून 100 टक्के अनुदानावर सामुहिक शेततळे घेण्यासाठी शेतक-यांच्या फळबागेच्या क्षेत्रानुसार सामुहिक शेततळे मंजूर करण्यात येणार आहेत. याचे विवरण पुढीलप्रमाणे - 500 घनमीटर पाणीसाठा, 2000 घनमीटर पाणीसाठा, 5000 घनमीटर पाणीसाठा, 8000 घनमीटर पाणीसाठा, 10000 घनमीटर पाणीसाठ्यासाठी अनुक्रमे 65 हजार, 1 लाख 75 हजार, 3 लाख 39 हजार, 4 लाख 80 हजार व 5 लाख 56 हजार इतके अनुदान देण्यात येईल. यासाठीचा नमुना तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असून लाभार्थी शेतक-यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्पवर करारनामा, हमीपत्र लिहून नोटरी करणे आवश्यक आहे, त्या शेतक-यांचे स्वतंत्र रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. प्रस्ताव सादर करणा-या शेतक-याचे फळबाग नोंदीसह स्वतंत्र 7/12 व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे तसेच या योजनेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक फळबाग शेतकरी एकत्र येऊन प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
याबाबतची अधिक तपशीलवार माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळळी यांनी केले आहे.
 
Top