इस्लामाबाद -: भारतीय मॉडेल्सच्या जाहिरातींवर बंदी आणण्याची मागणी पाकिस्तानी संसदीय समितीने सरकारकडे केली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरील निवेदीक नाही ओढणी वापरण्याची सक्ती करण्यात यावी अशी सूचना या समितीने केली आहे.  संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीच्या माहिती-प्रसारण स्थायी समितीच्या सदस्याची माहिती मंत्री कमार झमन कैरा यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत ही मागणी करण्यात आली. भारतीय मॉडेल्सचा समावेश असलेल्या जाहिरातींचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल असे कैरा यांनी स्पष्ट केले.
        पाकिस्तानी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रम व जाहिरातींमधील अश्लिलते प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सुनावणी सुरु असताना  अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्या ‘हेअर रिमूव्हर ’च्या जाहिरातीवर न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला होता. ही जाहिरात कुटुंबियांसोबत पाहण्यालायक नाही असा शेरा मुख्य न्यायमूर्तींनी मारला होता. भारतीय सुपरस्टार शाहरूख खान, कॅटरिना कैफ, करीना कपूर, शिल्पा शेट्टी, काजोल यांच्या जाहिराती पाकिस्तानात दाखवल्या जातात.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top