मुंबई -:  शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी ‘मातोश्री’वर फोन करून भेटीसाठी वेळ मागितली, परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. राणेंना दुस-यांदा फटकारण्यात आल्यामुळे त्यांनी ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांची भेट घेऊन सांत्वन केले.
        एका वाहिनीवरील बोलताना राणे यांनी बाळासाहेबांना भेटण्याची आपली इच्छा आहे, परंतु भेटू दिले जाईल असे वाटत नसल्याचे म्हटले होते. शिवसेनाप्रमुख आजारी असतानाही त्यांनी भेट घेण्याची इच्छा प्रकट केली होती. ‘मातोश्री’वर त्यांनी फोनही केला होता. ‘मातोश्री’वरून तेव्हा नकार तर आलाच, शिवाय पोलिसांनीही शिवसैनिकांचा ‘मातोश्री’ला गराडा असल्याने काहीतरी अघटित होईल. त्यामुळे राणे यांना ‘मातोश्री’वर न जाण्याचा सल्ला दिला होता.
       शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देतानाही राणे यांनी बाळासाहेबांच्या वरदहस्तामुळेच आपण उच्च पदांवर काम करू शकलो. त्यांच्यामुळेच आपण घडल्याचे म्हटले होते. तसेच ते आजारी असताना भेटू शकलो नाही याचा सल कायम राहील, अशी भावना व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर किमान उद्धव यांचे सांत्वन करावे म्हणून त्यांना शनिवारी भेट हवी होती. मात्र, दुस-यांदा त्यांना भेट नाकारण्यात आली.

* सौजन्‍य दिव्‍य मराठी

 
Top