श्रीराम पुजारी

             
      ‘गुरूजी’ ग्रामीण भागामध्‍ये अनेक कारणाने चर्चेत आहे. तर गुरूजी शाळेला दांडी मारून पुढारपण करतानाचे पाहिले आहे. परंतु भावी पिढी घडविण्‍याचे उदात्‍त कार्य करणा-या गुरूजीबद्दल हल्‍ली पूर्वीप्रमाणे पाहण्‍याचा समाजमानसचा दृष्‍टीकोन बदलत चाललेला आहे. असे असले तरी उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील काळनिंबाळा पश्चिम (ता. उमरगा) येथील जि.प. प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक श्रीराम पुजारी यांनी त्‍यास छेद देवून  आतापर्यंत दहा वेळा रक्‍तदान करून रक्‍तदान, नेत्रदान व अवयवदानाचे महत्‍त्‍व पटवून सांगत आहेत. एक दशकापासून समाजात जाणीव जागृती करीत करीत असून त्‍याही पुढे जाऊन त्‍यानी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयास आपला 'मरणोत्‍तर देहदान' करण्‍याचा संकल्‍प केला आहे. पुजारी गुरूजींचे आदर्श इतरांनी घेण्‍यासारखेच आहे.
       
       सध्‍याच्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा काळात मानवाने विज्ञानाच्‍या सहाय्याने मोठी क्रांती करून थक्‍क केले आहे. अनेक असाध्‍य गोष्‍टी साध्‍य करून विज्ञान नेहमीच चमत्‍कार करीत आले आहे. डोळयाला न दिसणा-या अणुरेणुंपासून, समुद्राच्‍या तळापासून, आकशगंगेतील नवीन ग्रहांपासून ते पृथ्‍वीच्‍या उत्‍पत्‍तीपर्यंत अनेक गोष्‍टींचा उलगडा विज्ञानाने करून दाखविल्‍याचे सर्वश्रूत आहे. मात्र मानवी शरीराचे गुढ अजून विज्ञानाला पुरेसे उलगडता आलेले नाही. आजही कृत्रीम रक्‍ताची निर्मिती झाली नाही. जगभरातील वैज्ञानिकांना नेहमीच हे आव्‍हान राहिले आहे. दिवसेंदिवस अपघातामुळे, आजारामुळे किंवा छोट्या मोठ्या शस्‍त्रक्रिया करताना रूग्‍णाला रक्‍ताची गरज निर्माण झाल्‍यास ते दुस-या व्‍यक्‍तीकडून रक्‍त घ्‍यावे लागते. म्‍हणूनच रक्‍तदानाला विशेष महत्‍त्‍व असून ते सर्वश्रेष्‍ठ दान मानले जात आहे.
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. मात्र भीतीपोटी किंवा गैर समजुतीमुळे रक्तदान केले जात नाही.  आजच्या काळात वाढते अपघात आणि इतर आजारांमुळे रक्ताची मागणीही वाढत आहे. त्यामुळे नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. यासाठीच रक्तदान नियमित होणे आवश्यक आहे. आजच्‍या तरुण पिढीनी समाजोपयोगी कार्य निःस्वार्थपणे करावे. त्‍याकरीता सामाजिक परिवर्तनाचे रणशिंग फुंकावे,  असे आवाहन पुजारी यांनी बोलताना केले आहे. रक्तदान हे दान जगातील कोणत्याही जाती-धर्माच्या लोकांना जोडण्याचे आणि माणूस म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम करते. तरीही रक्तदानाबाबतीत मात्र समाजात अजुनही फार गैरसमज व उदासीनता जाणवते. रक्तदानाविषयी आपल्या मनातील भीती किंवा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. नेत्राअभावी संपूर्ण आयुष्‍य अंधकारमय जीवन काहीना जगावे लागत आहे. सर्वत्र दिवसेंदिवस रस्‍ते अपघातात वाढ होत असून वैद्यकीय सुविधा वेळेवर न मिळाल्‍यामुळे अनेकांना आपल्‍या प्राणास मुकावे लागत असून समाजात नेत्रदान, रक्‍तदान, अवयवदान करण्‍याबाबत जाणीवजागृती करणे गरजेचे आहे.
भुसनूर (ता. आळंद) येथील प्रकाश फुलार हे पुजारीचे गुरूजींचे मामा असून त्‍यांची एक किडनी निकामी झाली होती. त्‍याना त्‍यांच्‍या सख्‍ख्‍या बहिणीने एक किडनी देवून आपल्‍या भाऊरायाचे प्राण वाचविले. ही घटना सन 1998 साली घडली. त्‍यावरून रक्‍तदान व अवयवदानाचे महत्‍त्‍व पुजारी गुरूजीना कळले. त्‍यावरून त्‍यांनी पहिल्‍यांदा रक्‍तदान केले. आतापर्यंत दहा वेळा त्‍यांनी रक्‍तदान केले असून श्रीराम पुजारी गुरूजींनी लातूरच्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आपला देह मरणोत्‍तर देहदान करण्‍याचा संकल्‍प केला आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग यांच्‍याकडे रितसर कागदोपत्राची पूर्तता केली आहे. नेत्रदानविषयी बोलताना पुजारी म्‍हणाले की, श्रीलंका देश हा असा एकमेव देश आहे की या देशात नागरीकांना नेत्रदान बंधनकारक केले असल्‍याचे सांगून श्रीलंकेत नेत्रहीन किंवा नेत्ररूग्‍णांची संख्‍या नाहीशी झाली आहे. श्रीलंका सरकारला मागणी केल्‍यास आवश्‍यकतेनुसार इतर देशांना नेत्र निर्यात करणारा एकमेव देश आहे. मात्र आपल्‍या देशात नेत्राअभावी अनेकांना अंधकारमय जीवन जगावे लागत आहे. त्‍याकरीता समाजात जाणीवजागृती करणे गरजेचे आहे. भविष्‍यात आपण सामाजिक बांधिलकीच्‍या भावनेने रक्‍तदान शिबीर, नेत्रदान, मरणोत्‍तर देहदान याबाबत जाणीव जागृतीचा संकल्‍प केला असून रक्‍तदानाबाबत अनेक गैरसमज लोकात आहेत, ते दूर करून त्‍याना त्‍याचे महत्‍त्‍व पटवून सांगत आहेत. त्‍यानी आतापर्यंत विविध शहरात नेत्रदान, रक्‍तदान शिबीर घेवून मोठ्याप्रमाणावर रक्‍तपेढीना रक्‍त संकलन करून दिले आहे. त्‍याचबरोबर येत्‍या काही दिवसात नळदुर्ग येथे भव्‍य रक्‍तदान शिबीर घेऊन अवयवदान, मरणोत्‍तर देहदान याविषयी माहिती देऊन जास्‍तीत जास्‍त जाणीवजागृती करून एक चळवळ उभी करण्‍याचा मनोदय त्‍यांनी 'तुळजापूर लाईव्‍ह' शी व्‍यक्‍त केला आहे.

* संपर्क - श्रीराम पुजारी, मो. 9423909385
 
Top