नवी दिल्ली -: अजमल आमिर कसाबच्या फाशीनंतर भारतात मोठा घातपात करण्याचे आदेश लश्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदने आपल्या 20 कमांडरांना दिल्याची कुणकुण लागताच गुप्तहेर खाते आणि गृहमंत्रालय सावध झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कसाबच्या फाशीनंतर नमाज-ए-जनाजामध्ये सईदने जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसलेल्या लश्करच्या कमांडरांशी संपर्क साधला. हे संभाषण टॅप करण्यात आले आहे. भारतात येणार्या पाकिस्तानी क्रिकेट प्रेक्षकांच्या जत्थ्यात आयएसआय काही स्लीपर सेल (दहशतवाद्यांना मदत करणारे सामान्यांच्या भूमिकेतील लोक) पाठवण्याची भीती आहे.
हे लोक सिंगल एंट्री व्हिसावर भारतात प्रवेश करतील आणि परतण्याऐवजी येथेच भूमिगत होतील. नंतर या स्लीपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांची योजना लश्कर व आयएसआय आखत असल्याचे गुप्तहेर खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले. ‘ऑपरेशन बदला’अंतर्गत या कारवाईत लश्करने तालिबान गुरिल्ला फोर्सही भारतात घुसवण्याचे कारस्थान रचले आहे. गुप्तहेर खात्याने दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रालयाने 26/11 हल्ल्याच्या स्मृतीदिनी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यांत हाय अलर्ट जारी केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असल्यामुळे हिमाचल प्रदेशातील शांत भागांमध्ये घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा आहे, अशी माहितीही गुप्तहेर खात्याला मिळाली आहे. याबाबत हिमाचल प्रदेश प्रशासनास सावध करण्यात आले असून जम्मू-काश्मीर सीमेवरही हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
* सौजन्य दिव्यमराठी