सिडने -: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व महान फलंदाज रिकी पाँटिंग याने अखेर क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धावा काढण्यात सातत्य नसल्याने व कामगिरी खराब होत असल्याचे कारण सांगून पाँटिंगने आपल्या १७ वर्षाच्या लांबलचक कारकिर्दीला अखेर विराम दिला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु असून, पाँटिंगला तिस-या कसोटीसाठी संघात स्थान दिले आहे. 
        पाँटिंगने कसोटी क्रिकेट आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना, आपण स्थानिक क्रिकेट, प्रथम श्रेणी व लीग क्रिकेट सामने खेळणार असल्याचे म्हटले आहे.
      आपल्या निवृत्तीबाबत पाँटिंगने टि्वटरवर टि्वट केले आहे की, माझी मागील एक वर्षापासून कामगिरी खराब होत आहे. माझ्याकडून पुरेशा धावा होत नाहीत. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत माझी कामगिरी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूसारखी होत नसल्याचे मला वाटते. म्हणूनच मी स्वत: क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करीत आहे. यासाठी मला निवड समितीने निवृत्ती घेण्यास सांगितले नसल्याचेही रिकीने स्पष्ट केले आहे.
     ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या मायदेशात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत पाँटिंगला धावा करता आल्या नाहीत. आफ्रिकेविरुद्धच्या ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटीत तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर ऍडलेड येथे झालेल्या दुस-या कसोटीत तो अनुक्रमे ४ आणि १६ धावांवर (दोन्ही डावात त्रिफळाचित) बाद झाला होता. १६७ कसोटी सामने खेळलेला पाँटिंग आपल्या कारकिर्दीत दुस-यांदाच दोन्ही डावात त्रिफळाचित झाला होता. त्याचवेळी आपले सर्वोत्तम दिवस संपले असल्याची जाणीव होताच निवड समितीने न सांगताच पाँटिंगने निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी रिकी पाँटिंग महत्त्वाचा खेळाडू असून, तो आम्हाला इंग्लंडविरुद्ध होणा-या ऍशेस मालिकेसाठीसुद्धा हवा आहे, असे दोन दिवसापूर्वी म्हटले होते. तरीही 'फंटर' (फंटर हे रिकीचे टोपननाव असून, संघात त्याला या नावानेच ओळखले जाते) रिकी पाँटिंगने आपला निर्णय जाहीर केला.
        38 वर्षाचा पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी १६७ कसोटी सामने खेळला. तर, ३७५ एकदिवसीय सामने खेळला. १७ टी-२० सामनेही तो ऑस्ट्रेलियासाठी खेळला आहे.
         कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट प्रकारात पाँटिंगने प्रत्येकी १३ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पाँटिंगने कसोटीत ४१ आणि एकदिवसीय सामन्यात ३० शतके झळकावली आहेत. तसेच कसोटीत त्याची सरासरी ५० पेक्षा जास्त तर, एकदिवसीय सामन्यात ४० पेक्षा जास्त राहिली आहे.  

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top