तुळजापूर -: श्री तुळजाभवानी मातेच्‍या दर्शनासाठी व जावळ काढण्‍यासाठी आलेल्‍या कर्नाटक राज्‍यातील दोन भक्‍तांचातुळजापूर येथील मातोश्री भक्‍तनिवासाजवळील एका लॉजवर विजेचा धक्‍का बसून दुर्दैवी मृत्‍यू झाला. एक बालक जखमी झाला. ही घटना बुधवार दि. 28 नोव्‍हेंबर रोजी दुपारी पौर्णिमेदिवशी दुपारी बारा वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. 
सखुबाई मलप्‍पा पानेगर (वय 45, रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे तुळजापुरात मरण पावलेल्‍या महिलेचे नाव असून राजू ऊर्फ शिवलिंगप्‍पा शिवशरण सालोटगी (वय 22, रा. नेवनूर, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा) असे सोलापुरात उपचारावेळी मरण पावलेल्‍या तरूणाचे नाव आहे. विशाल ऊर्फ शरणबसप्‍पा दत्‍ता पानेगर (वय 3, रा. कोंढवा, पुणे) असे जखमी मुलाचे नाव असून त्‍याच्‍यावर शासकीय रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्‍त तसेच सखुबाई हिच्‍या नातीचे जावळ काढण्‍यासाठी पानेगर व सालोटगी यांच्‍या कुटुंबातील लोक हे टेम्‍पोतून बुधवार सकाळी तुळजापूरात आले होते. तुळजाभवानी मंदिराजवळी मातोश्री भक्‍तनिवासाजवळील एका लॉजच्‍या पहिल्‍या मजल्‍यावरील खोलीत हे सर्वजण उतरले होते. दुपारी बारा वाजण्‍याच्‍या सुमारास विशाल हा खोलीच्‍या खिडकीच्‍या समोरूनच रस्‍त्‍यावरील पथदिव्‍याच्‍या मुख्‍य तारांशी काठीच्‍या मदतीने खेळत होता. त्‍यावेळी काठीच्‍या मदतीने खेळू नको असे म्‍हणत असताना विशालला विजेचा जोरदार धक्‍का लागला. त्‍यामुळे त्‍याची आजी सखुबाई हिने त्‍याला बाजूला घेण्‍याचा प्रयत्‍ना केला असता त्‍यांनाही विजेचा शॉक लागून तोल जाऊन त्‍या खाली पडून गंभीर जखमी होऊन मरण पावल्‍या. त्‍याचवेळी विशालचा मामा राजू सालोटगी हा काठीच्‍या मदतीने विशालला तारेपासून दूर करत असताना त्‍यालाही विजेचा धक्‍का लागून ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्‍यामुळे त्‍यांना उपचारासाठी सुरूवातीला तुळजापूर ग्रामीण रूग्‍णालय आणि तेथून सोलापूर येथील शासकीय रूग्‍णालयात हलविण्‍यात आले. उपचार सुरू असताना राजू सलोटगी हा दुपारी मरण पावला. याबाबात तुळजापूर पोलीस ठाण्‍यात नोंद करण्‍यात आली आहे.
 
Top