उस्मानाबाद -: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून  सामाजिक समस्या सोडविण्यासाठी या स्त्री शक्तीचा विधायक उपयोग होत आहे. महिला सबलीकरणामुळे अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
             केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे विविध विभाग, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन आणि तुळजापूर नगर परिषदेच्या सहकार्याने तुळजापूर येथे  27 ते 29 नोव्हेंबर या  दरम्यान या भारत निर्माण लोकमाहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित महिला बचत गट मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, पत्र सूचना कार्यालयाचे संचालक प्रशांत पाठराबे, लोकप्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा डा. स्मिता शहापूरकर, पोलीस उपअधिक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, माध्यम अधिकारी मोहंमद अख्तर सईद, जिल्हा शल्य चिकित्सक डा. अशोक धाकतोडे, तुळजापूरच्या गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे आदींची उपस्थिती होती.
          पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यत लाभ पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांत 50 टक्के आरक्षण, बचत गटांना 4 टक्के व्याजदराने कर्ज यासह महिलांच्या हिताचे विविध निर्णय शासनाने घेतले आहेत. या योजना महिलांपर्यंत पोहोचतील आणि त्या सबल होतील याची काळजी आपण घेतली पाहिजे. बचत गट चळवळ ही त्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. 
          बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करते, मात्र त्यांच्या उत्पादनाचे मार्केटींग होणे महत्वाचे असल्याचे सांगून पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, महिलांनी शेळीपालन, कुक्कुटपालन यासारख्या शेतीपूरक आणि  अल्प खर्चिक व्यवसायांकडे वळले पाहिजे. विशेषता मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागात याची प्रकर्षाने गरज आहे.
        अजूनही समाजात स्त्रीभ्रूण हत्येसारख्या घटना घडतात. हे प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगून पालकमंत्री चव्हाण यांनी राज्य शासन याबाबतीत कठोर भूमिका घेतअसल्याचे सांगितले. अशी कृत्ये करणाऱ्यांनी समाजातील कोणत्याच घटकाने पाठिशी घालू नये, असेही त्यांनी सांगितले. समाजातील हुंडा पद्धत, लग्नात वारेमाप खर्च या गोष्टी टाळाव्या असे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.
            तत्पूर्वी, स्त्री भ्रूण हत्या या विषयावर बोलताना पोलीस उप अधिक्षक वालावलकर यांनी उपस्थित महिलांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. अतिशय सोप्या व ओघवत्या शैलीत त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत स्त्री भ्रूण हत्या विषयाचे गांभीर्य पटवून दिले. आपल्या देशाला आपण भारत माता म्हणतो, मात्र महिलांना आदर देणारी आपली सामाजिक जाणीव आज कुठे हरवली आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.  मुलगा हवा की मुलगी याचे स्वातंत्र्य महिलेकडे नसते. वैद्यकीयदृष्ट्या ते सर्व पुरुषावर अवलंबून असते. हे माहिती असतानाही आपण महिलेला दोषी मानून तिचा छळ करतो, ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शासन आणि प्रशासन ही मानसिकता बदलण्यासाठी काम करतच आहे, मात्र ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे श्रीमती घारगे-वालावलकर म्हणाल्या. 
        जि. प. अध्यक्ष डा. व्हट्टे यांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षण विचाराने महिला अधिकाधिक संख्येने पुढे येत असल्याचे सांगितले. 
        महिला बचत गट मेळाव्याच्या उदघाटनानंतर  डा शहापूरकर यांचे महिला व बालकांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी बालकाच्या आणि मातेच्या उत्तम आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. 
           कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध योजनांची माहिती देणारे 40 स्टाल्स लावण्यात आले असून याठिकाणी भेट देण्यासाठी तुळजापूरकरांची गर्दी होत आहे. प्रास्ताविक पाठराबे यांनी केले. 
 
Top