नळदुर्ग -: भारतीय स्टेट बँक व शासनाच्यावतीने राबविण्यात येणा-या विविध योजनांचा शेतक-यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आर्थिक प्रगती करावी, असे मत भारतीय स्टेट बँक शाखा अणदूरचे व्यवस्थापक चंद्रकांत सोनकांबळे यांनी व्यक्त केले.
चिवरी (ता. तुळजापूर) येथे भारतीय स्टेट बँक शाखा अणदूर व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोनकांबळे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सधन शेतकरी जयप्रकाश बायस हे होते. यावेळी पुढे बोलताना सोनकांबळे म्हणाले की, शेतक-यांनी शेती व शेतीपुरक असा दुग्धव्यवसाय, फळबाग लागवड, ठिबक सिंचन, शेळीपालन, पशुपालन विषयक व्यवसाय व कृषी औजारे यासाठी शासकीय योजनासह भारतीय स्टेट बँकेकडून पुरविण्यात येणा-या अर्थ सहाय्य व कर्जविषयक बाबींचा लाभ घेणे गरजेचे आहे. शिवाय गेल्या चार महिन्यात आठशे लाभार्थी शेतक-यांना 4 कोटी 86 लाख रूपये पीककर्ज वाटप करण्यात आले. तसेच बँकेच्यावतीने आठ शाळांना सिलिंग फॅन व सात शाळांना पाणीशुद्धीकरण यंत्र देण्यात आल्याचे ही सांगण्यात आले. यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे, तानाजी पाटील, प्रमोद मुळे, किसन शिंदे, महेश बलसुरे, एस.बी. शिंदे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारूती बनसोडे यांनी तर वैजनाथ मुंडे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.