सोलापूर :- विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच संस्कार शिकविले जावेत, भविष्यातील आव्हाने पेलण्याची शक्ती शिक्षणातून मिळाली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले.
अक्कलकोट - शिवपुरी येथील शारदामाता इंग्लिश स्कुलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे, नगराध्यक्ष श्रीमती महानंदा स्वामी, पंचायत समिती सभापती श्रीमती विमलताई गव्हाणे, संस्थेचे अध्यक्ष जगतभाऊ जाजु, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, श्रीमती माला राजीमवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिक्षणमंत्री दर्डा म्हणाले की, या शाळेच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण घेण्याची या परिसरातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली. या संधीचा फायदा घ्या, मनसोक्त खेळा, आनंद घ्या, तसेच केवळ पुस्तकी ज्ञान घेवू नका, शिक्षणातून संस्कार शिकविले जावेत, संस्कार हा शिक्षणाचा भाग आहे. असे सांगून या शाळेतून जीवनमुल्याचे शिक्षण दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यातील शिक्षकांचे, शिक्षण सेवकांचे प्रश्न सोडविले आहेत तसेच राज्यात राबविण्यात आलेल्या कॉपीमुक्त अभियानाची व शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध महत्वपुर्ण निर्णयांची दर्डा यांनी माहिती दिली.