उस्मानाबाद -: मुर्टा (ता. तुळजापूर) येथे सन २०११ ते २००३ या कालावधीत पितांबर गवळी पोस्टमास्तर म्हणून नौकरीस असताना खातेदारानी जमा केलेले पैसे किर्दमध्ये तसेच शासनाकडे जमा न करता त्याचा अपहार केल्याचा आरोप सिध्द झाल्याने उस्मानाबाद येथील मुख्य न्यायदंडाधिकारी द.गो. राजे यानी पितांबर विश्वंभर गवळी यास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथे पोस्टमास्तर म्हणून पितांबर गवळी हे कार्यरत असतना त्यांनी वेगवेगळ्या खातेदारांकडून जमा करण्यात आलेल्या आरडी व सेव्हींगच्या रकमा स्वीकारून त्या संबंधित खातेदारांच्या पासबुकात जमा करून घेतल्या. तसेच स्वत:ची सही व पोस्टाचा शिक्का मारून खातेदारास पासबुकही परत दिले. प्रत्यक्षात मात्र ही रक्कम त्याने पोस्ट ऑफिसमधील खात्यामध्ये भरलीच नाही. ५ हजार ९०० रूपयांचा अपहार केला, अशी फिर्याद पोस्ट अधिकारी सुरेश बनसोडे यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकारणाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे पोस्टाचे अधिकारी व खातेदार यांचे जबाब नोंदविण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून मुख्य न्यायदंडाधिका-यांनी आरोपी पितांबर गवळी यास भादंवि कलम ४०९ नुसार १ वर्षसक्त मजुरी व एक हजार रूपये दंड, दंड नाही भरल्यास तीन महिने सक्त मजुरी, भादंवि कलम ४६५ अन्वये १ वर्षसक्त मजुरी व एक हजार रूपये दंड आणि दंड नाही भरल्यास तीन महिने सक्त मजुरी तसेच भादंवि कलम ४६८ अन्वये एक वर्षसक्त मजुरी व एक हजार रूपये दंड व दंड नाही भरल्यास तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा वेगवेगळ्या भोगावयाच्या आहेत, असे सहा.शासकीय अभियोक्ता अँड. व्ही.एस. कुलकर्णी यांनी सांगितले.