उमरगा -: काळनिंबाळा (प) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक रघुनाथ पांडुरंग बलसुरे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने त्यांचा शाळेच्या व ग्रामस्थाच्यावतीने भव्य नागरी सत्कार करून त्याना निरोप देण्यात आले.
रघुनाथ बलसुरे यांचा जन्म 1966 साली एका गरीब, अशिक्षित कुटुंबात झाला. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन डी.एड. अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1988 साली शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यांनी 24 वर्षे उत्कृष्टपणे ज्ञानदानाचे कार्य केले. मात्र गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या आरोग्याची समस्या उदभवल्याने त्यानी स्वतःहून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. त्यांची उर्वरित सेवा 12 वर्षे राहिलेली आहे. त्यांचा मौजे काळनिंबाळा या ठिकाणी दि. 31 ऑक्टोबर रोजी भव्य कार्यक्रमात सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी पुजारी एस.के., सागरी बी.बी., शेख झेड.के., दिगंबर दासमे आदीनी सत्कारमूर्तीबद्दल गौरवोद्दगार काढून त्यांच्या कार्याची माहिती देऊन प्रशंशा केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. हिराबाई दिगंबर दासमे या होत्या. यावेळी सरपंच दिगंबर पाटील, मुख्याध्यापक पोळे, शिक्षक नाटेकर, मरपळे यांच्या शिक्षक, विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू वाकळे तर आभार शाम वाकळे यांनी मानले.