उस्मानाबाद :- सध्या नवरात्र, दसरा, दिवाळी,व ख्रिसमस असे सणासुदीचे दिवस सुरु होत आहेत. या दिवसात विशेषत मिठाई, ड्रायफ्रुटस, सजावटीच्या, शोभेच्या वस्तू तसेच फटाके आदि वस्तुंची खरेदी मोठया प्रमाणात केली जाते. या कालावधीत ग्राहकांची फसवणूक होवू नये त्यासाठी ग्राहकांनी खरेदी व्यवहारात जागरुक राहाणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खरेदी करतांना प्रामुख्याने ग्राहकांना खालील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
ग्राहकांनी या वस्तू खरेदी करतांना त्या दिलेल्या मोबदल्यानुसार वजनात, मापात, संख्येत बरोबरच मिळतील याची खात्री करावी. व्यापाऱ्याने टेबल काटा व स्वयंदर्शी काटयाचे इलेट्रॉनिक्स इंडिकेटर अशारितीने ठेवावा की ग्राहकास वजन करण्याची प्रक्रिया स्पष्टपणे दिसू शकेल. इलेट्रॉनिक्स स्केलच्या इंडिकेटर 00 (शुन्य) असल्याखेरीज त्यावर वजन केले जाणार नाही, याकडे लक्ष दयावे. शिवाय डिस्प्लेमध्ये 00 (शुन्य) होण्यापर्यंत वजन केले जाणार नाही याची खात्री करावी. मिठाई, ड्रायफु्टस, मावा, खवा इत्यादी खरेदी करतेवेळी त्यांचे वजन खोक्याशिवाय करणे दुकानदारास बंधनकारक आहे.
दुकानदाराने वस्तुचे निवळ वजन करुनच वस्तू खोक्यात टाकाव्यात. पॅकबंद (आवेष्टित) मिठाई, ड्रायफ्रुटस, भेटवस्तू व सजावटीच्या वस्तू इत्यादीच्या आवेष्टनावर वस्तुचे नाव, उत्पादकाचे/आवेष्टकाचे/आयातदाराचे नाव व संपुर्ण पत्ता, आवेष्टित वस्तूचे निव्वळ वजन/ माप/संख्या, विक्रीची किरकोळ किंमत, उत्पादनाचे/ आवेष्टनाचा महिना व वर्ष, उत्पादकाचे/ आवेष्टकाचे/ आयातदाराचे ग्राहक हेल्पलाईन नंबर इत्यादी बाबी घोषित करणे आवश्यक आहे, ग्राहकांनी वस्तूसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत देऊन वस्तू खरेदी करु.नये. ग्राहकांनी वस्तूवरील खाडाखेड आढळल्यास अशी आवेष्टीत वस्तू खरेदी करु नये, या संदर्भात काही गैरपकार आढळून आल्यास नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य. मुंबई यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 022-22886666 यावर अथवा dclmms complaints@yahoo-com या संकेत स्थळावर, वैध मापन शास्त्र् विभागाच्या विभागीय उप नियंत्रक, जिल्हा सहाय्यक नियंत्रक किंवा संबधित निरीक्षकाकडे तक्रार नोंदवावी.