नळदुर्ग -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून संस्‍थापक अध्‍यक्ष अरविंद गोरे यांनी संपूर्ण मराठवाड्यात आपल्‍या कर्तृत्‍वाचा ठसा उमटावून उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचा त्‍यानी नावलौकीक केला, से प्रतिपादन माजी आमदार तथा लातूर सिद्धेश्‍वर बँकेचे चेअरमन सिद्रामप्‍पा आलुरे गुरूजी यांनी केले.
नळदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्‍टीस्‍टेट को-ऑपरेटीव्‍ह क्रेडीट सोसायटीच्‍या नळदुर्ग शाखेचा शुभांरभ  माजी आमदार सिद्रामप्‍पा आलुरे गुरूजी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सोसायटीचे संस्‍थापक अध्‍यक्ष अरविंद गोरे हे होते. नगराध्‍यक्ष नितीन कासार, नगरसेवक देविदास राठोड, तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे माजी चेअरमन सिद्रामप्‍पा खराडे, सोसायटीचे संचालक शिवदास कांबळे, उत्‍तम लोमटे, माजी जि.प. सदस्‍य विजय सरडे, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अॅड. दिपक आलुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आलुरे गुरूजी म्‍हणाले की, मल्‍टीस्‍टेट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी सुरू करण्‍याचा उपक्रम स्‍तुत्‍य आहे. आज प्रत्‍येक क्षेत्रात शेतक-यांना सुविधा उपलब्‍ध करून देणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रात काम करीत असताना अनेक संस्‍था बंद पडले असल्‍याचे पहावयास मिळाले, सहकारी संस्‍था मोडकळीस का येत आहेत, त्‍यामागचे कारण काय हे सर्वांना माहितच आहे. संस्‍थेत काम करीत असताना सहकारी साखर कारखाने उभी करणारी नेतेमंडळी आज खाजगी साखर कारखाने काढत आहेत. अशा नेतेमंडळीनी एक तर सहकारी साखर कारखान्‍यात राहावे किंवा खाजगी साखर कारखाने काढावीत. आज भ्रष्‍टाचारामुळे सहकारी संस्‍था बंद पडत चालल्‍या आहेत. 'जाऊ ति‍थे खाऊ' या वृत्‍तीमुळे आज शिक्षण क्षेत्रासारखे पवित्र क्षेत्रही बदनाम होत आहे. शिक्षण संस्‍था काढून पैसे कमविण्‍याचा धंदा आज सुरू आहे. अरविंद गोरे यांनी साखर कारखाना व्‍यवस्थित चालविला आहे. त्‍यांच्‍यावर लोकांचा विश्‍वास आहे. त्‍यांनी मल्‍टीस्‍टेट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी सुरू करून शेतक-यांना अडचणीच्‍या कामात मदत करण्‍याचे काम सुरू केले आहे. आज जिल्‍हा बँक अडचणीत आहे. त्‍यामुळे मल्‍टीस्‍टेट सोसायटीच्‍या माध्‍यमातून शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. त्‍यामुळे सर्वांनी अरविंद गोरे यांना या कामी सहकार्य करावे, असेही आलुरे गुरूजी यांनी शेवटी सांगितले.
यावेळी अध्‍यक्ष समोरापात अरविंद गोरे म्‍हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्‍यावरील शेतक-यांचे प्रेम व त्‍यातून निर्माण झालेली विश्‍वासार्हता या भांडवलाच्‍या बळावर आज आम्‍ही बँकींग क्षेत्रात काम सुरू केले आहे. लोकांच्‍या सहकार्याच्‍या ताकदीवर आर्थिक व्‍यवहार करणारी संस्‍था अल्‍पावधीतच नावारूपास आली आहे. केवळ सहा महिन्‍यात या सोसायटीच्‍या बारा शाखा सुरू करण्‍यात आल्‍या असून जवळपास या सोसायटीमध्‍ये चार कोटी रूपयाची मुदत ठेव जमा झाली आहे. या मल्‍टीस्‍टेटमध्‍ये पहिल्‍या दिवसापासूनच कोअर बँकींग सेवा सुरू करण्‍यात आली आहे. मल्‍टीस्‍टेट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटीच्‍या माध्‍यमातून अर्थकरणाबरोबरच सामाजिक कार्यही करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top