नळदुर्ग -: ऊसाला कोयता लावण्‍यापूर्वी साखर कारखान्‍यानी ऊसाचा भाव जाहीर करावा, अन्‍यथा फडात जाऊ देणार नाही व ऊस तोडू देणार नाही, अशी ताठर भूमिका नळदुर्ग परिसरातील ऊसउत्‍पादक शेतक-यांनी घेतल्‍याने तुळजापूर तालुक्‍याच्‍या बाहेरील कारखान्‍यांची वाहने ऊसाच्‍या फडाबाहेर ताटकळत थांबल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तुळजापूर तालुक्‍यातील शेतक-यांच्‍या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्‍या श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्‍त्‍वावर चालविण्‍यास घेतल्‍या दृष्‍टी शुगर उद्योग समूहाने बोरी धरणात पाणी नसल्‍याने आणि पावसाअभावी कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र घटल्‍याने कारखाना सुरू केले नाही. सध्‍या सर्वत्र ऊसाची कमतरता असल्‍याने ऊस मिळविण्‍यासाठी साखर कारखान्‍यांमध्‍ये चढाओढ लागली आहे. तर दुसरीकडे ऊस तोडण्‍यापूर्वी कारखान्‍याने ऊसाचा भाव जाहीर करावा, अशी भूमिका ऊस उत्‍पादक शेतक-यांनी घेतली आहे.
यावर्षी पाऊस झाला नसल्‍याने सर्वत्र ऊसाच्‍या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. जो ऊस उपलब्‍ध आहे, त्‍यापैकी काही ऊस चांगल्‍या दर्जाचा नसल्‍याने ऊसाच्‍या उत्‍पादनात मोठी घट होणार आहे. त्‍यामुळे कारखान्‍याचे गळीत हंगाम यशस्‍वी होण्‍यासाठी सर्वच कारखान्‍यांना ऊसाची नितांत गरज आहे. त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त ऊस आपल्‍या कारखान्‍याला मिळावा यासाठी साखर कारखान्‍यांमध्‍ये मोठी चढाओढ लागली आहे. यावर्षी श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित दृष्‍टी शुगर अॅड डिस्टिलरीजने यावर्षीचा आपला गळीत हंगाम बंद ठेवला आहे. त्‍यामुळे तुळजापूर तालुक्‍यातील ऊस मिळविण्‍यासाठी गळीत हंगाम सुरू असलेल्‍या साखर कारखान्‍यामध्‍ये सध्‍या भलतीच चढाओढ लागल्‍याचे दिसून येत आहे. सध्‍या या ठिकाणी लोकमंगल, विठ्ठल साई, आंबेडकर, मातोश्री शुगर अॅन्‍ड जनरेशन व भुसणी येथील साखर कारखान्‍यांच्‍या गाड्या ऊस मिळविण्‍यासाठी शेतक-यांच्‍या शेतातील ऊसाच्‍या फडाशेजारी उभ्‍या असल्‍याचे दिसत आहे. सध्‍या तुळजापूर तालुक्‍यात तीन ते साडेतीन लाख मेट्रीक टन ऊस उपलब्‍ध असल्‍याची नोंद आहे.
सध्‍या साखरेचे भाव वाढले असल्‍याने त्‍या धर्तीवर ऊसाला वाढीव भाव मिळावा, असे शेतक-यांचे म्‍हणणे आहे. मात्र अद्याप कुठल्‍याच साखर कारखान्‍याने ऊसाचा भाव जाहीर केला नाही. प्रत्‍येक कारखाना म्‍हणत आहे की, दुसरा कारखाना जो भाव देईल, त्‍याच्‍यापेक्षा पन्‍नास रूपये आम्‍ही जास्‍त भाव देवू, मात्र कुठल्‍याच कारखान्‍याने ऊसाचा भाव जाहीर केला नसल्‍याने ऊस उत्‍पादक शेतक-यांनी जोपर्यंत कारखाना ऊसाचा भाव जाहीर करीत नाही, तोपर्यंत कुठल्‍याच साखर कारखान्‍याला ऊसतोड देणार नसल्‍याचा पवित्रा नळदुर्ग परिसरातील ऊसउत्‍पादक शेतक-यांनी घेतला आहे. त्‍यामुळे नळदुर्ग परिसरात अनेक साखर कारखान्‍यांच्‍या गाड्या शेतक-यांच्‍या या पवित्र्यामुळे ऊसउत्‍पादक शेतक-यांच्‍या शेताजवळ जावून उभ्‍या आहेत, ज्‍यावेळेस ऊस भरपूरअसतो, त्‍यावेळेस याच साखर कारखान्‍यांनी ऊस उत्‍पादक शेतक-यांना ऊसाला कमी भाव देऊन त्‍यांची ऊस घेतले होते. मात्र आज ऊसाचे क्षेत्र कमी असल्‍याने ऊसउत्‍पादक शेतकरी भाववाढ मागत आहे.

 
Top