परळी -: भाजपचे ज्येष्ठ नेते व लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांना अखेर पुतण्या धनंजय मुंडे यांनी राजकीय धक्का दिला आहे. धनंजय यांनी गोपीनाथरावांना 'जोर का झटका धीरीसे' देत गेल्या २० वर्षापासून त्यांच्या ताब्यात असलेली नाथ्रा या गावातील ग्रामपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविलेल्या धनंजय मुंडेंना त्यावेळी फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, नाथ्रा या आपल्या गावी चुलते गोपीनाथरावांना पहिला राजकीय धक्का देत ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले. 
       धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मजूर पॅनेलने गोपीनाथ मुंडेच्या वैध्यनाथ विकास पॅनेलचा ७-० असा धुव्वा उडवत पराभव केला. विशेष म्हणजे मुंडे यांच्या नाथ्रा गावात २० वर्षानंतर प्रथमच ग्रामपंचायतीची निवडणुक झाली आहे. गोपीनाथराव मोठे नेते असल्याने व गावातील सर्व कारभार पुतण्या धनंजय हाताळत असल्याने गेली २० वर्षे नाथ्रा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत होती. मात्र, गोपीनाथरावांपासून पुतण्या धनंजय दुरावताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. 
            गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू व धनंजय यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांनी, जिल्हा परिषद निवडणुक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली होती. तसेच पंडितअण्णांचा त्यावेळी दारुण पराभव झाला होता. त्यामुळे धनंजय यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. धनंजय यांनी सहा महिन्यापासूनच या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली होती. त्या डावपेताच ते यशस्वी ठरले. 
       खासदार गोपीनाथ मुंडे आणि मुलगी आमदार पंकजा यांनीही गावात तळ ठोकला होता. मात्र, गोपीनाथराव व पंकजा यांचा मुक्काम मुंबईत असल्याने संपर्क कमी होत असल्याचे निवडणुक निकालावरुन सिद्ध झाले. तर, गावातील कार्यकर्त्यांचा संच धनंजय यांच्यामागेच असल्याचे या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी

 
Top