मुंबई -: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अंत्यविधी ज्या जागेवर (शिवाजी पार्क) झाला, ती जागा शिवसैनिकांसाठी अयोध्यातील राम  मंदिरासारखी पवित्र आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय हा श्रद्धेचा असून, यात सरकारने व न्यायपालिकेने पडू नये, याबाबतचा निर्णय शिवसैनिकच घेतील, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 
      बाळासाहेब ठाकरे यांच्यावर १८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता त्या जागेवर शिवसैनिकांसह सर्वांना दर्शन घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तसेच या जागेवर बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केली होती. जोशी यांच्या मागणीला शिवसेनेच्या सर्व नेत्यांचीही तीच इच्छा आहे. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवाजी पार्कात स्मारक उभारणे तांत्रिकदृष्या व कायद्यानुसार अशक्य व अवघड असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी सरकारला व न्यायपालिकेला एक प्रकारे इशाराच दिला आहे. 
      बाळासाहेबांचा विषय व स्मारक हा तमाम मराठी बांधवांच्या श्रद्धेचा व आस्थेचा विषय असल्याचे सांगत जागेच्या मालकी हक्काबद्दल सरकारने व न्यायपालिकेने वाद उभा करीत यात पडू नये, असे मत मांडले. तसेच शिवाजी पार्कवरील जागेविषयी आणि बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी शिवसैनिकच निर्णय घेतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 
      शिवाजी पार्कमधील ज्या जागेवर बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या जागेवर एक चौथरा तयार करण्यात आला आहे. तेथे तेव्हापासून आजही काही शिवसैनिक कायम उपस्थित असतात. तेथे बाळासाहेब ठाकरेंची एक प्रतिमाही ठेवण्यात आली आहे. तसेच या प्रतिमेसमोर अंखंड दिप लावण्यात येत आहे. या जागेवर अनेक शिवसैनिक व ठाकरेप्रेमी येऊन  बाळासाहेबांना आदरांजली वाहत दर्शन घेतात. त्यामुळेच ही जागा अयोध्येतील राममंदिरासारखीच प्रवित्र असल्याचे खासदार राऊत सांगत आहेत. 
    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचे शिवसेनेकडून भांडवल केले जात असल्याची टीका राष्ट्रवादी  काँग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत आपली भूमिका मांडताना सांगितले की, बाळासाहेबांचे स्मारक बांधायला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र ते, महापालिकेच्या नियमाप्रमाणेच व्हावे, त्यासाठी धमकीची भाषा वापरणे व कायदा हातात घेणे चुकीचे आहे. शिवसेना बाळासाहेबांच्या स्मारकावरुन राजकारण करु पाहत आहे ते चुकीचे असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे. 

* सौजन्‍य दिव्‍यमराठी

 
Top