सोलापूर :-  येत्या 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन असून या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एड्स निर्मुलनासाठी सामुहिकरित्या प्रबोधन करावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी व्यक्त केली.
         एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व संयोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी (कार्यालय) यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. 
       एच.आय.व्ही मुक्तीचा संदेश जिल्ह्यातील सर्व गावांत पोहोचवा, संपूर्ण जिल्ह्यात रेड रिबन क्लबची स्थापना करा तसेच सोलापूर विद्यापीठ व अश्विनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या दिवसानिमित्त शहरात प्रबोधन करण्यात यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. मवारे यांनी यावेळी केल्या. 
      एच.आय.व्ही संसर्ग न होऊ देणे, , एड्सने होणा-या मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे, एड्सग्रस्तांना मानसिक आधार देऊन त्यांच्याबाबतचा भेदभाव व कलंक मिटविणे तसेच तालुकास्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी रॅलीचे आयोजन करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. 
       दि. 26 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र, सोलापूर यांच्यावतीने जिल्ह्यात एकूण 20 पथनाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र अधिकारी, सोलापूर सयाजी गायकवाड यांनी प्रास्ताविकात दिली. 
         या आढावा बैठकीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिनकर रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे, महानगरपालिकेचे कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शहाजी गायकवाड, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक प्रमोद हिंगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. तुकाराम शिंदे, डॉ. पट्टणशेट्टी यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य (रेड रिबन क्लबचे अध्यक्ष), तसेच स्वयंसेवी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

 
Top