उस्मानाबाद -: पाण्याचा अतिउपसा झाल्याने मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे नैसर्गिक स्‍त्रोत आपण दुर्लक्षित केल्याने आणि त्याचा व्यवस्थित उपयोग केला नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अशा परिस्थितीत या जलसंपत्तीचा जपून वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन भूजल अभ्यासक तथा पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी केले. 
      केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे विविध विभाग, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन आणि तुळजापूर नगर परिषदेच्या सहकार्याने तुळजापूर येथे  27 ते 29 नोव्हेंबर या  दरम्यान या भारत निर्माण लोकमाहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या सत्रात घोरपडे यांचे भूजलाचा पर्यायी वापर याविषयावर मार्गदर्शन झाले. त्यावेळी ते बोलत होते. 
घोरपडे म्हणाले की, पूर्वीच्या काळी पाणी वापराबाबतची जागरुकता होती. आज आपण ही जागरुकता गमावून बसलो असून प्रत्येक ठिकाणी पाण्याचा अतिवापर होत आहे. या अतिउपशावर नियंत्रण नसल्याने नद्या,नाले,ओढे कोरडे पडले आहेत. पाणी साठविण्याची व्यवस्थाच आपण व्यवस्थित सांभाळू शकत नाही ही परिस्थिती भूषणावह नाही. नैसर्गिक स्त्रोतांची काळजी घेणे आवश्यक आहे आणि हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. 
          यानंतर नाबार्डचे सहायक व्यवस्थापक सी.डी. देशपांडे  यांचे नाबार्डच्या विविध योजनांची माहिती देणारे भाषण झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पत्रसूचना कार्यालयाचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी केले तर सूत्रसंचालन अंकुश चव्हाण यांनी केले. पाहूण्याचे स्वागत पाठराबे व माध्यम अधिकारी मोहम्मद अखतर सईद यांनी केले.                                
 
Top