अकलूज -: यशस्वी इन्स्टीटयुट व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम असलेल्या शिका व कमवा योजनेसाठी अकलूज येथील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळ, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग व महाराष्ट्र शासन, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.  ४ नोव्‍हेंबर रोजी 'माळशिरस तालुका सुशिक्षित बेरोजगार - रोजगार भरती मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. अकलूज येथील शंकरराव मोहितेपाटील स्मृतीभवन, शंकरनगर येथे सकाळी ११ वाजता या मेळाव्याचे उद्‌घाटन होईल. 
या मेळाव्याचे उद्‌‌घाटन अकलूज शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष जयसिंह शंकरराव मोहितेपाटीलयांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाला पुणे येथील व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे,  सोलापूर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अरविंद सावंत, यशस्वी इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, यशस्वी इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे शैक्षणिक संचालक प्रदीप तुपे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
या रोजगार मेळाव्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व यशस्वी इन्स्टीटयुट ऑफ टेक्नोलॉजीच्यावतीने राबविण्यात येणा-या 'शिका व कमवा योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा सर्व खर्च उद्योग क्षेत्राने अर्थात विविध कंपन्यांनी स्वीकारला असून विद्यार्थ्याला डिप्लोमा इंजिनिअरच्या पदवीकेपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी खर्च येत नाही.  तसेच  विद्यार्थ्याला पहिल्या वर्षी दरमहा पाच हजार रूपये, दुस-या वर्षी दरमहा साडेपाच हजार रूपये, तर तिस-या व चौथ्या वर्षी दरमहा अनुक्रमे सहा हजार व साडेसहा हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. याशिवाय संबंधित कंपनीतील उपलब्ध कॅन्टीन व बससेवेचाही लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो.
      दहावी पास, बारावी पास, नापास, आयटीआय व एमसीव्हीसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी प्रवेश दिला जातो. सध्या राज्यात सुमारे १२५ हून अधिक कंपन्यांमधून सात हजार विद्यार्थ्यांनी विनामूल्य शिक्षणाबरोबरच रोजगारही प्राप्त करीत आहेत. अशा या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी या या योजनेची माहिती घेण्यासाठी मेळाव्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मेळाव्याचे मुख्य संयोजक संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.  मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी रविकांत साठे ९८९०७४१३०० व मकरंद जोशी ९८८१२२४८६१ यांच्‍याशी संपर्क साधावा. 
 
Top