
भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे अणदूर शाखेच्या बँकेत बहुसंख्य खातेदाराना या ठिकाणी व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत असून नाहकच गैरसोयीला तोंड द्यावे लागत असल्याने खातेदारातून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत लाभार्थी खातेदारातून बँकेच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
अणदुर (ता. तुळजापूर) येथील भारतीय स्टेट बॅकेने परिसरातील अणदूर, चिवरी, उमरगा चिवरी, फुलवाडी, धनगरवाडी, केरुर, बाभळगाव, इटकळ, खानापूर, खुदावाडी, केशेगाव, सराटी यासह १४ गावे दत्तक घेतले असून आजअखेर या बँकेचे जवळपास २५ हजार बचत खातेदार ग्राहक आहेत.त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे वयोवृद्ध बँकेचे खातेदार, सेवानिवृत्त कर्मचारी, परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शेतकरी, खासगी शैक्षणिक संस्थांचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, प्राध्यापक, छोटे-मोठे व्यावसायिकासह अन्य सर्वसामान्य बँकेच्या खातेदारांचा समावेश आहे. दररोज तीस लाखाच्या जवळपास तर महिन्याकाठी नऊ कोटी रुपयाची उलाढाल होत असल्याचे समजते. या बँकेत दररोज यात्रेसारखी ग्राहकांची एकच गर्दी उसळलेली असते. त्यामुळे बँकेची इमारत अपुरी पडत आहे. जेष्ठ नागरिकांना आसन व्यवस्था अपुरी पडत असल्याने त्यांना ताटकळत बँकेच्या आवार्याच्या बाहेर थांबावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या ठिकाणी मंजूर कर्मचार्यापैकी निम्मेच कर्मचारी असल्याने त्याना ग्राहकाना सेवा देताना तारेवरची मोठी कसरत करावी लागत असल्याचे दृश्य नेहमीचेच झाले आहे. तीन महिन्यापूर्वी या बँकेत १२ हजार खातेदार ग्राहक होते. मात्र आज अखेर त्यात दाम दुप्पट वाढ होवून खातेदारांची वाढलेली संख्या बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने लक्षात घेऊन तात्काळ एटीएम सेवा उपलब्ध करुन द्यावी, त्याचबरोबर कर्मचार्यांची संख्या वाढवून सर्वसामान्य ग्राहकांना योग्य सेवा उपलब्ध करुन दिलासा देण्याची मागणी बँक खातेदारातून होत आहे.