सोलापूर :- दुष्काळी परिस्थितीशी सामना करणा-या सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष मिटविण्यासाठी आणि पाण्याचे अखंड स्त्रोत निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत तब्बल २ कोटी ७१ लाख ७० हजार रुपये खर्च करुन जिल्ह्यातील २४७० विहीरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे. एवढया मोठया प्रमाणावर विहीर पुनर्भरण करणारा सोलापूर हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.
जिल्हा परिषद सोलापूर मार्फत सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विहीरींचे पुनर्भरण करण्यासाठी धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मे २०१२ मध्ये या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. साधारणत: संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनला पहिला पाऊस पडतो. परंतू सोलापूर जिल्ह्यात मात्र १ जुलैच्या पुढे पाऊस पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणा-या या जिल्ह्याला पाणी टंचाईवर ठोस उपाययोजना करण्याची गरज भासत होती. ही गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी वेळोवेळी बैठका घेऊन सर्व गटविकास अधिका-यांना विहिर पुनर्भरणाचे उद्दीष्ट ठरवून दिले.
सुरुवातीस ज्या ठिकाणी विहीर पुनर्भरण झाले त्याचे फायदे अनेक शेतक-यांनी पाहिले. त्यामुळे हळूहळू या योजनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होत गेला व विहीर पुनर्भरण कामास गती मिळाली. पाणी अडवा, पाणी जिरवा ही कृती प्रत्यक्षात अमलात येऊ लागली.
विहीर पुनर्भरणाची कामे केल्याने चालू वर्षाच्या पावसाळी हंगामात वाहून जाणारे पाणी संकलित करुन विहीरीत सोडल्याने पाणी पातळीत वाढ झाल्याचे दृश्य स्वरुपातील फायदे दिसून येत आहेत. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, विशेष घटक योजना व जवाहर योजना इत्यादी विविध शासकीय योजनातंर्गत हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आला. आजमितीस अक्कलकोट तालुक्यात १०९, बार्शी ३००, करमाळा ११०, कुर्डुवाडी २८१, माळशिरस २४, मंगळवेढा ८१, मोहोळ २१३, उ.सोलापूर ६५, पंढरपूर ३७, सांगोला १६ आणि द.सोलापूर तालुक्यामध्ये ११२ विहीरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी विहीर पुनर्भरण भूगर्भ जलसाठयातील पाणी पातळीत वाढविण्यास मदत होत असून, शेतातील गाळ पाण्याबरोबर खड्डयात वाहून नेता येतो. याच गाळाचा शेतात पुनर्वापर करता येतो. बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टळते असे अनेक फायदे हा कार्यक्रमातून होत आहेत. एवढेच नव्हे तर पाणी व्यवस्थापन व नियोजनपूर्वक पुनर्वापर याचा धडाही जिल्ह्यातील लोकांना मिळत आहे. राज्य शासन राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सोलापूरचा दुष्काळ नक्कीच सुकाळामध्ये बदलेल यात शंका नाही.