सोलापूर :- मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक या गावात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्याच्या जलसंपदा विकास कार्यक्रमातंर्गत ५९.५४ लक्ष रुपये खर्च करुन साखळी पध्दतीचा सिमेंट नाला बंधा-याचे काम करण्यात आले. यामुळे अल्प पावसातही या बंधा-यांमध्ये ५.१८ टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला असून दुष्काळी सलगर बुद्रुक जलमय झाले आहे.
राज्याच्या कोरडवाहू क्षेत्राचा विचार करुन त्या भागातील पावसाचे पाणी अडवून त्याचा वापर करणे शक्य असल्यामुळे व त्याचे दृष्य परिणाम ताबडतोब दिसत असल्यामुळे शासनाने जलसंपदा विकास कार्यक्रम हाती घेतला. याचा फायदा निश्चितच सोलापूरसारख्या कमी पाऊस पडणा-या जिल्ह्याला होतोय हे सलगर बुद्रुक गावामुळे जाणवत आहे.
या साखळी बंधा-यामुळे खरीप हंगामातील २५४४ हेक्टर आणि रब्बी हंगामातील १३३९ हेक्टर आणि ४४० हेक्टर हंगामी बागायत क्षेत्रास पाणी मिळणे शक्य झाले आहे. तालुक्यातील पाण्याची उपलब्धता व वारंवार येणारी दुष्काळ सदृष्य परिस्थिती, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना करावी लागत असलेली वणवण तेथे शेतीच्य पाण्याचा विचार करणे देखिल दुरापास्त होते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सवरच सगळी भिस्त होती. दुष्काळसदृष्य स्थितीमुळे शेतीची अवस्था वैराण माळारानासारखी झाली होती. यावर शाश्वत उपाय करणे गरजेचे होते.
हिच मूलभूत बाब विचारात घेऊन सरासरी ५५० मी.मी. पर्जन्यमान असणा-या या गावाची जलसंपदा कार्यक्रमातंर्गत साखळी पध्दतीचे सिमेंट बंधारे बांधण्यासाठी निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने मे महिण्यात या बंधा-याचे काम सुरु करण्यात आले. त्यावेळी गावातील २८२ विहीरी व ४२३ बोअरवेल्सची पाणी पातळी केवळ १.५० मीटर एवढी होती.
जून आणि जुलै महिण्यात झालेल्या अल्प पाऊस होऊन देखिल या साखळी सिमेंट नाला बंधा-यात अतिशय चांगल्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. भविष्यात चांगला पाऊस पडल्यास या बंधा-यामधुन १०७.६० टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारचे बंधारे इतर ठिकाणी निर्माण केल्यास निश्चितच अवर्षण प्रवण मंगळवेढा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल.