आघाडी शासनाने दारिद्रय रेषेखालील किंवा अल्प उत्पन्न गटातील सामान्यातील सामान्य लोकांच्या आरोग्याच्या समस्या सुधाराव्यात, त्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उदात्त हेतूने २ जुलै २०१२ पासुन सोलापूरसह आठ जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अमलबजावणी सुरु केली होती. शासनाच्या या योजनेस सोलापूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आपले आरोग्य सुधारावे यासाठी गरीब जनता या योजनेचा खुप मोठया प्रमाणावर लाभ घेत आहे.
गरीबांना नजरेसमोर ठेऊन धोरणात्मक आणि खंबीर पाऊले उचलणा-या आघाडी शासनाच्या प्रत्येक योजनेमुळे समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणुन ठेवले आहे. शासन राबवित असलेल्या या योजनमुळे निश्चितच सुदृढ व आरोग्यदायी महाराष्ट्राचे स्वप्न सत्यात उतरेल यात तिळमात्र शंका नाही.
दारिद्रय रेषेखालील लोकांच्या आरोग्य संवर्धनासाठी सुरु केलेल्या या योजनेतंर्गत एकटया सोलापूर जिल्ह्यात केवळ चार महिण्यात मोठया व सामान्य स्वरुपाच्या मिळून तब्बल २१७९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आज पर्यंत ५ कोटी ६६ लाख ३५ हजार रुपये रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी खर्ची पडले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात या योजनेतंर्गत झालेल्या २२२९ शस्त्रक्रियेपैकी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या व मोठया स्वरुपाच्य असणा-या हृदयाच्या गुंतागुंतीच्या ४१३ शस्त्रक्रिया, शरीरातील उर्त्सजन संस्थेशी निगडीत असणा-या ३८५ शस्त्रक्रिया, अपघात दुर्घटनेच्या २०५ शस्त्रक्रिया, किडनीशी संबंधित १८५ शस्त्रक्रिया, सामान्य स्वरुपाच्या १०४ शस्त्रक्रिया तर १८७ रुग्णांवर कर्करोगाशी निगडीत आणि १३० रुग्णांवर तात्काळ औषधोपचारांतर्गत आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
दारिद्रयाने पछाडलेल्या नागरिकांना उत्तम दर्जाच्या व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने एका खाजगी विमा कंपनीच्या मदतीने ही योजना पहिल्या टप्प्यात यशस्वीरित्या राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ घेणा-या अनेक रुग्णांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या व शासनाची सामान्य लोकांबद्दल असणारी संवदेनशीलता अधोरेखीत करणा-या आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील तळनुर गावचे रहिवासी असलेल्या इरम्मा लक्ष्मण कुरले या महिलेवर हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या विषयी इरम्मा म्हणाल्या की, "आम्ही शेतात राबणारं आणि हातावर पोट असणारी माणस. देवान लई तरास देणारी बिमारी नशिबाला लावली. एवढा पैका आमच्यापाशी कुठन येणार?. पर तालुक्याच्या सरकारी डाक्टरन मला राजु गांधी तब्यतीच्या सवलतीबद्दल सांगतलं तवा सोलापूरात जाऊन त्याचा फायदा घ्यायचा ठरविलं आन् सोलापूर सहकार दवाखान्यात इस आक्टबरला मज आप्रेशन झाल. शासनाच्या या सवलतीमुळ मज जन्माच दुकण गेलं" इरम्मा यांच्यावर ह्दयाची झडप बदलण्याची शस्त्र्क्रिया या योजनेमुळे मोफत आणि सहजगत्या शक्य झाली त्यामुळे त्यांनी शासनाचे व योजनेचे भरभरुन कौतूक केले.
मेंदुच्या गाठीची शस्त्रक्रिया झालेले बार्शी तालुक्यातील घोरळे गावचे हमाल काम करणारे जानीवंत घोडके यांना तर सामान्यरित्या जगणे अवघड होऊन बसले होते. घरातील कर्ता म्हणून जबाबदारी असणा-या जाणीवंत यांचा कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतू या योजनेतंर्गत बार्शीच्या जगदाळेमामा रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आज त्यांची प्रकृती अत्यंत चांगली असून थोडयाच दिवसात ते पुर्वीसारखे संसाराचा गाडा समर्थपणे ओढु शकतील.
* रुपाली गोरे
जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर