महाराष्ट्र शासनाने सामान्य शेतक-याकरिता शेतकरी जनता अपघात विमा योजना सन २००६-०७ पासुन लागू केली आहे. या योजनेतंर्गत शेतक-याला अपघात झाल्यास त्याला विमा कंपनीकडुन अर्थसहाय्य मिळणार आहे. शेतकरी अपघात विमा संरक्षणामध्ये  शेतक-याला रस्त्यात अथवा रेल्वे अपघात झाल्यास, पाण्यात बुडून मृत्यू आल्यास, जंतू नाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे अनवधानाने विषबाधा झाल्यास, विजेचा धक्का लागून अपघात झाल्यास, अंगावर वीज पडून मृत्यू झाल्यास, शेतक-याचा खून झाल्यास, एखाद्या ऊंच ठिकाणावरून पडून अपघात झाल्यास, सर्पदंश अथवा विंचूदंश झाल्यास, नक्षलवाद्याकडून हत्या झाल्यास, जनावरांनी चावल्यामुळे अथवा खाल्ल्यामुळे जखमी अगर मृत्यू झाल्यास, दंगलीमध्ये किंवा अन्य कोणत्याही अपघातामुळे मृत्यू झाल्यास या विमा योजनेचा शेतक-याला व त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळू शकतो. 
  या विमा योजनेच्या लाभार्थी पात्रतेच्या निकषानुसार शेतकरी हा महसूल नोंदणीनुसार खातेदार असला पाहिजे. त्यांच्या वारसदारामध्ये शेतक-याची पत्नी किंवा मृत शेतकरी पत्नीचा पती तसेच त्यांची अविवाहित व विवाहित मुलगा, मुलगी, आई, नातवंडे या वारसदारांना विम्याची रक्कम अनुज्ञेय आहे. 
  शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास, दोन डोळे अथवा अन्य दोन अवयव निकामी झाल्यास तसेच एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई व एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. 
           शेतकरी जनता अपघात विमा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी गावातील कृषी सहाय्यकास देण्यात आलेली आहे.  सोलापूर जिल्ह्यात सन २०११-१२ या आर्थिक वर्षात सप्टेबर अखेर पर्यंत या योजनेतंर्गत ११५ दावे दाखल झाले असून ५६ मंजुर झाले आहेत तर इन्शुरन्स कंपनीकडे ३९ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक-यांनी यात सहभागी होण्याची गरज आहे.  

* रुपाली गोरे
   जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

 
Top