नळदुर्ग -: दिवाळीचा सण आनंदात साजरा करावे व त्यापासून कोणीही वंचित राहू नये, याकरीता नळदुर्ग येथील 'आपलं घर' प्रकल्पातील अनाथ व निराधार बालकांना मोफत फराळ व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. उस्मानाबार रोटरी क्लब व सेवा ट्रस्ट, ठेकेदार शिवाजीराव गपाट, जेष्ठ पत्रकार भारत गजेंद्र गडकर, मानगाव (जि. रायगड) येथील डॉ. श्रीकांत भावे यांच्या कल्पनेतून व त्यांच्या प्रयत्नामुळेच अनाथ व निराधार बालकांना दिवाळीची ही अनोखी भेट देण्यात आली आहे. यामुळे अनाथ, निराधार बालकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नळदुर्ग येथील आपलं घरमध्ये 175 अनाथ व निराधार मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या मुला-मुलींना दि. 10 नोव्हेंबर रोजी रोटरी क्लब व रोटरी सेवा ट्रस्ट, उस्मानाबाद यांच्या वतीने फराळ्याच्या साहित्याबरोबरच इतरही साहित्याचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे अनाथ व निराधार मुलांची दिवाळी चांगल्याप्रकारे साजरी होऊ शकली. 'आपलं घर' येथील मुला-मुलींना दिवाळीच्या फराळाचे व साबण, मेहंदी, यासह इतर स्टेशनरी साहित्याचे वाटप नळदुर्ग शहर पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे, शिवाजी नाईक, तानाजी जाधव यांच्या हस्ते बालकाना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी आपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार, श्रीराम पोतदार, गोरख जगताप, अण्णा सनदी, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम जेठे, कार्यकर्ते वसंतराव घोडके, खंडू मुळे, पालक पांडुरंग शिंदे, प्रभाकर जाधव, सुमन सुर्यवंशी, विजया बेवलकर, मंगल शिरसे, आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संतोष बुरंगे यानी मानले.