
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, दिपावलीचा सण हा आनंद आणि चैतन्य घेऊन येतो,नव्या कामांची सुरुवात करुन आपल्या आयुष्याला तसेच समाजाला देखील एक चांगले वळण देण्यासाठी हा सण आपल्याला प्रेरित करतो. आज आपले राज्य नव्या आव्हानांना ताकदीने सामोरे जात आहे. आपल्या समोरील लक्ष्य आहे ते राज्याला अधिक वैभवशाली बनविण्याचे. या सगळ्या वाटचालीत समाजातील दुर्बल आणि मागासलेल्या घटकांच्या आयुष्यातील अंधार देखील दूर करुन त्यांचे आयुष्य प्रकाशमन करायचे आहे. दिवाळी हा सण सुख, आणि आनंद वाटण्याचा आहे. यात जाती धर्माला स्थान नाही. बंधुभावाचा आणि सौहार्दाचा संदेश मनाशी बाळगून आपण पुढील वाटचाल केल्यास खऱ्या अर्थाने विकास साधू अशी मला खात्री वाटते.
राज्याने उद्योगात चांगली आघाडी घेतली असून भविष्यात देखील ती टिकून राहिल, अनेक रोजगार यातून निर्माण होतील. शेतीला भरभराटीचे दिवस आणण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांमुळे बळीराजाचे भविष्य देखील उज्वल होणार आहे. प्रकाशाचे प्रतिक असणाऱ्या ऊर्जेच्या उत्पादनातील अडथळे दूर सारुन लवकरच आपले राज्य पूर्णपणे प्रकाशमान होण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. अमंगलाचा मुकाबला करीत मंगलमय पर्वाची सुरुवात करणारी ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.