नळदुर्ग -: येडोळा (ता. तुळजापूर) येथे गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या तलाठी व ग्रामसेवक यांना अतिक्रमण काढण्यास मज्जाव केला. या कारणावरून ग्रामस्थ व अतिक्रमणधारकात झालेल्या मारहाणीमध्ये दोघेजण जखमी झाले. पोलीसानी वेळीच हस्तक्षेप केले. याप्रकरणी चोघांविरूद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू धोडींबा राठोड, विमल धोडींबा राठोड (येडोळा, ता. तुळजापूर) असे जखमी नाव असून पिंटू सु्ग्रीव जाधव, राजू विठ्ठल जाधव, योगेश जाधव, भालू राठोड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे 40 एकर सरकारी गायरान जमीन आहे. गावातील जनावरे चरण्यासाठी ही जमीन आहे. मात्र या जमिनीवर धोंडीबा राठोड यांनी अतिक्रमण करून शेती केली आहे. या जमिनीत गावातील जनावरे चरण्यास धोंडीबा राठोड यांनी मज्जाव केला. मात्र राजा जाधव यानी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून जमीन गावातील जनावरे चरण्यासाठी मंजूर करून द्यावे म्हणून प्रयत्न केले. राजा जाधव यांच्या प्रयत्नांना यश येवून उस्मानाबाद जिल्हाधिका-यांनी 21 जुलै 2011 रोजी तुळजापूर तहसिलदारांना सदरील गायरान जमिनीवरील अतिक्रमण दूर करून ही जमीन गावातील शेतक-यांच्या जनावरांना चरण्यासाठी मंजूर करून देण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार 4 ऑक्टोबर 2012 रोजी तहसिलदारांनी येडोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना शासन निर्णयानुसार आपल्या गावातील गायरान जमिनीवरील झालेल्या अतिक्रमण नियमानुसार दूर करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार ग्रामसेवक एम.एस. आकोसकर यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणा-या धोंडीबा राठोड यांना सदरील अतिक्रमण सात दिवसात काढून देण्याची नोटीस बजावली. मात्र धोंडीबा राठोड यांनी दिलेल्या मुदतीमध्ये अतिक्रमण न काढल्याने दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रामसेवक एम.एस. आकोसकर, तलाठी एम.एन. कोकणे हे पोलीस बंदोबस्तासह गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गायरान जमिनीवर गेले.
यावेळी शेकडो ग्रामस्थ आपल्या जनावरांसह गायरान जमिनीवर पोहचले होते. मात्र यावेळी अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढण्यास मज्जाव केला. यावेळी ग्रामस्थांनी आपली जनावरे गायरान जमिनीत चरण्यासाठी सोडले असता, राजू धोंडीबा राठोड, विमल धोंडीबा राठोड, कोमल राजेंद्र राठोड, शालूबाई तिपू पवार, तिपू खेमू पवार यांनी ग्रामस्थांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर गेलेल्या ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणी राजू राठोड, विमल राठोड हे जखमी झाले. सुरूवातीला दोन पोलीस बंदोबस्ताला होते. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आणखी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. याप्रकरणी वरील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड, हवालदार सुहास गवळी, देविदास गायकवाड, बाबुराव घोडके, श्रीमंत मिसाळ हे घटनास्थळी आले व परिस्थिती व्यवस्थित हाताळून वातावरण शांत केले. सरंपच पोमा जाधव, उपसरपंच प्रभाकर पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले होते.