नळदुर्ग-: भरधाव ट्रकने कारला समोरासमोर जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात वरिष्ठ भूवैज्ञानिक जागीच झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना उस्मानाबाद जवळील शिंगोली येथे दि. 2 नोव्हेंबर रोजी पहाटेपूर्वी एक वाजता घडली. अपघातातील मयत उस्मानाबाद पाणीपुरठा विभागातील भूवैज्ञानीक पदावर कार्यरत होते.
संजय लक्ष्मण भोगे (वय 41 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर, हल्ली मुक्काम बँक कॉलनी, उस्मानाबाद) असे अपघात मरण पावलेल्या भूवैज्ञानिकाचे नाव आहे. नागनाथ पुजारी, राजेंद्र संत, संजय अष्टगे असे जखमीचे नाव आहे. तर देवेंद्रसिंह डंबरसिंह (रा. कच्चानाऊ, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. संजय भोगे हे आपल्या मारुतीगाडी (क्र.एमएच २५ आर ३३६९) मध्ये नागनाथ पुजारी, राजेंद्र संत, संजय सुर्यकांत अष्टगे हे शिंगोली येथील धाब्यावर जेवण करून उस्मानाबादकडे परतत असताना शिंगोली येथील पुलाजवळ आल्यानंतर समोरुन येणा-या भरधाव ट्रकने (क्र. आरजे ११ जेए २९७७) जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालवणारे संजय भोगे यांचा जागीच मृत्यू झाला तर कार मधील नागनाथ पुजारी, राजेंद्र संत, संजय अष्टगे हे जखमी झाले. या अपघातात कारचा चुराडा झाला. या अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भोगे यांच्या मृत्यूची बातमी जळकोट (ता. तुळजापूर) या त्यांच्या गावी समजताच त्यांच्या कुटूंबीयासह जळकोट गावावर शोककळा पसरली होती. एका क्षणातच संपुर्ण बाजारपेठ बंद झाली. भोगे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळकोट तर उच्च शिक्षण सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात पुर्ण झाले ते बालवयापासूनच तेजस्वी बुद्धीमत्तेचे होते. त्यांनी ज्युऑलॉजी (भुगर्भशास्त्र)या विषयात तत्कालीन शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सध्या ते उस्मानाबाद येथे वरिष्ठ भुवैज्ञानिक या पदावर कार्यरत होते. भोगे यांच्या पश्चात आई, वडिल, लहान भाऊ, बहिण, पत्नी, एक मुलगी, दोन जुळी मुले असा परिवार आहे. जळकोट येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रकरणी संजय सुर्यकांत अष्टगे यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास दुय्यम फौजदार पुल्ली हे करीत आहेत.