सोलापूर -: जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर मार्फत निवृत्ती वेतन, कुटूंब निवृत्ती वेतन घेणा-या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांना कळविण्यात येते की, सन 2012-2013 या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त झालेले निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्ती वेतन आयकर पात्र होत असेल तर सर्व संबंधितांनी आपला पॅन नंबर व बचत बाबतची माहिती जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर या कार्यालयात दिनांक 10 जानेवारी 2013 पर्यंत सादर करावी.
पॅन कार्ड सादर न केल्यास व आयकर पात्र असल्यास भारत सरकार वित्त मंत्रालय, महसूल विभाग यांनी दिनांक 20 जानेवारी 2010 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार माहे जानेवारी 2013 च्या निवृत्ती वेतन, कुटूंब निवृत्ती वेतनातून त्यांचा आयकर 20 टक्के दराने परस्पर कपात केला जाईल व कपात केलेल्या आयकर परताव्याबाबत हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
तसेच सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांना असेही आवाहन करण्यात येते की, त्यांनी निवृत्ती वेतन, कुटूंब निवृत्ती वेतनावरील आगाऊ आयकर परस्पर भरणा करु नये. आगाऊ भरणा केलेल्या आयकराबाबत हे कार्यालय जबाबदार राहणार नाही असे, आवाहन संवितरण व आहरण अधिकारी तथा अप्पर कोषागार अधिकारी एन. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.
* निवृत्तीवेतन धारकांचा 10 डिसेंबरला मेळावा
सोलापूर -: सोलापूर जिल्हयातील सर्व निवृत्ती वेतनधारक,कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा दिनांक 10 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11 वाजता बहुउद्दे'शीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी सदर मेळाव्यास जिल्हयातील सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांनी मोठया प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी बी. एम. पाटील यांनी केले आहे.
* 3 डिसेंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द
सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यामध्ये माहे नोव्हेंबर 2012 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्याबाबतची आचारसंहिता लागू करण्यात आलेली असल्याने 3 डिसेंबर 2012 रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उप जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी एका पत्रकान्वये दिली.