पंढरपूर -:  राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छतामंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे व सौ.अनुराधा ढोबळे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त श्रीविठ्ठल, रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
         विठ्ठला! राज्यातील शेतकरी व जनतेला सुखी ठेव, मुक्या जनावरांना विपुल प्रमाणात  चारा उपलब्ध व्हावा तसेच राज्यात वेळेवर पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर जनतेला पाणी मिळावे असे साकडे पालकमंत्री प्रा.ढोबळे यांनी श्रीविठ्ठल चरणी घातले.कार्तिकी एकादशी निमित्त श्रीविठ्ठल, रुक्मिणीची सपत्निक शासकीय महापूजा केल्यानंतर मंदीर समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ना.ढोबळे बोलत होते.
       यावेळी आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे, माजी आमदार उल्हास पवार,विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार आदी उपस्थित होते.
        यावेळी बोलताना पालकमंत्री ढोबळे म्हणाले की, मंदीर परिसरापासून दहा किलोमीटर इतक्या परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत.याप्रसंगी आण्णा डांगे, बबनराव पाचपुते तसेच बाळासाहेब बडवे यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.
       कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे येथील वारकरी धर्मा विठू कांबळे, (वय 45) व रंजना धर्मा कांबळे, (वय 40) यांना कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाल्याबद्दल मंदीर समितीच्या वतीने संपूर्ण वर्षभर मोफत प्रवास करण्याबाबत एस.टी.चा पास श्री डांगे यांच्या हस्ते कांबळे दापत्यांला प्रदान करण्यात आला.
      याप्रसंगी मंदीर समितीचे सदस्य सर्वश्री बाळासाहेब बडवे, वसंत पाटील, प्रा.जयंत भंडारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.                                   

 
Top