मुंबई -: महापुरुषांची स्मारके व पुतळे उभारण्यापेक्षा विकासाभिमुख व लोकापयोगी कामे करावीत, अशी नवी भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विरोध करणारी मनसे बाळासाहेबांच्या स्मारकालाही विरोध करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कात उभारण्याची शिवसेनेसह विविध स्तरावरुन होत असतानाच राज ठाकरे यांच्या मनसेने घेतलेल्या या नव्या भूमिकेमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीही इंदू मिलच्या जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यास विरोध करताना, बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल, त्याच जागेवर त्यांच्या नावाने भव्य असे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभे करावे, असे मत व्यक्त केले होते.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्याबाबत वादविवाद सुरू असताना मनसेच्या नगरसेवकाने हे स्मारक इंदू मिलवर उभारण्याची मागणी करून दलित संघटनांना चुचकारले होते. मनसेच्या या मागणीला सर्वच राजकीय पक्षांतून विरोध झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अथवा अधिकृत मागणी केलेली नाही. मात्र, मुंबईतील पक्षाच्या एका नगरसेवकाने बाळासाहेबांचे स्मारक इंदू मिलमध्ये उभारावे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर उद्भवलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी शुक्रवारी स्मारकासाठी मनसेने इंदू मिलच्या जागेची मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाच्या नगरसेवकांनी मांडलेली भूमिका त्यांचे वैयक्तिक मत असून, अधिकृत निर्णय केवळ राज ठाकरेच घेतील. त्याचप्रमाणे केवळ पुतळे उभारण्यापेक्षा लोकापयोगी कामे व्हावीत, अशी पक्षाची भूमिका पहिल्यापासून आहे असेही शिदोरे यांनी स्पष्ट केले.
* सौजन्य दिव्य मराठी