मुंबई -: शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर फेसबुकवर ‘बंद’विरोधी मत व्यक्त करणा-या दोन मुलींना केलेली अटक व त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे चुकीचेच होते, असा अहवाल कोकणचे पोलिस महानिरीक्षक सुखविंदरसिंग यांनी शुक्रवारी महासंचालकांकडे सादर केला. ही कारवाई करणा-या पालघरच्या अधिका-यांवर विभागीय कारवाई करण्याची शिफारसही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालघर येथील शाहीन धाडा आणि रितू श्रीनिवासन यांना रविवारी अटक झाल्यानंतर पोलिस आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. अॅड. आभा सिंह यांनी तर याप्रकरणी थेट महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचा अहवाल पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांच्याकडून मागवला होता. त्यानुसार कोकण पोलिस महानिरीक्षक सुखविंदरसिंग यांना चौकशी अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते.
या मुलींवर आधी कलम 295 (अ) म्हणजे धार्मिक भावना भडकावणे लावण्यात आले होते. पण त्यांनी केवळ बंदच्या विरोधात मत नोंदवल्याचे सांगत या कारवाईवर टीका झाली तेव्हा जात, धर्म, पंथ, भाषा आदींच्या आधारे समजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न असे कलम 505(2) लावण्यात आले. प्रत्यक्षात हे कलमही या प्रकरणामध्ये लागू होत नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे याप्रकरणी तपास काय झाला, या मुलींवर हीच कलमे का लावली, पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेतला होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे पोलिस महानिरीक्षकांनी या सर्व बाबींची चौकशी करून हा अहवाल सादर केला आहे.
गृहमंत्र्यांकडे आज अहवाल देणार - मुलींच्या अटकेबाबतचा चौकशी अहवाल आपल्याकडे आला असून गृह विभागामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी सांगितले. हा अहवाल शनिवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. केवळ फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर आपले मत व्यक्त केल्याने या मुलींना झालेली अटक म्हणजे अभिभाषण स्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका सर्व स्तरातून पोलिसांवर करण्यात आली. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जस्टिस मार्कंडेय काटजू यांनीही याप्रकरणी निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
* सौजन्य दिव्य मराठी
* सौजन्य दिव्य मराठी