उस्मानाबाद -: जिल्हा पोलीस अधिका-यांनी विविध ठिकाणी छापा मारून सुमारे १७ हजार रूपयाची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शंकर राजेंद्र शिंदे (वय २५ वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी), मालन हरी पवार (वय ३८ वर्षे, रा. कळंब), किरण धोंडीबा राठोड (वय २४ वर्षे, रा. येडोळा, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. दि. ४ नोव्हेंबर रोजी पोलीसांनी वाशी, कळंब व नळदुर्ग येथे अचानक छापा मारून वरील आरोपीकडून सुमारे १६ हजार ९६० रूपये किंमती अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी तिघांविरूद्ध पोलीसात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* सात जुगा-यास अटक; तीन हजाराचा मुद्देमाल जप्त
उस्मानाबाद -: तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलीसानी अचानक मारलेल्या छाप्यात सुमारे तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी घडली असून याप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी कातुरे, अण्णा गवारे, भाऊसाहेब गवारे, नागनाथ कारकर, विनोद बापु वाघमारे, नासीर मुलानी, जावेद इनामनाद (सर्व रा. जवळा नि, ता. परंडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. वरील सर्वजण जवळा (नि) येथील सोसायटीच्या तिरट नावाचा जुगार खेळत होते. त्यावेळी पोलीसाच्या विशेष पथकाने अचानक छापा जुगाराच्या साहित्यासह सुमारे 2 हजार ९३० रूपयाचा मुद्देमाल पोलीसानी जप्त केला. याप्रकरणी वरील सातजणांविरूद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
तुळजापूर -: अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून सुमारे ३० हजार रूपये चोरून नेल्याची घटना तुळजापूर येथील सारा गौरव कॉलनीमध्ये दि. ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली.
मुरलीधर कोंडीबा लिमकर (रा. तुळजापूर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी चांदीची समई, गणपती, छल्ले असे मिळून २५ हजाराचा माल चोरून नेले. तसेच मुरलीधर लिमकर यांच्या शेजारी असलेले प्रशांत गोपाळराव कोडे (वय ५५ वर्षे) यांचे सासरे सुधाकर कुलकर्णी यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ ग्रॅम सोन्याचे दोन अंगठा व एक नथ व रोख रक्कम असे मिळून सुमारे ५ हजार रूपये चोरून नेले, अशी फिर्याद प्रशांत कोंडे यांनी दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध तुळजापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशपांडे हे करीत आहेत.
* जीपमधून पडल्याने एक ठार
शिराढोण -: चालत्या जीपमधून खाली पडल्याने एकजण गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रूग्णालयता उपचार सुरू असताना तो मरण पावल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हिंगनगाव शिवारातील तलावाकडे जाणा-या रोडवर घडली.
गणेश बबन लोंढे असे जिपमधून पडल्याने मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. यातील गणेश लोंढे हा त्याच्या मित्र माणिक रावसाहेब कांबळे यांच्या समवेत मासे आणण्यासाठी हिंगणगावकडून तळ्याजवळील रोडन पिकअप जीप (क्र. एमएच 25 पी 1421) मधून जात असताना त्यांच्या समोर एक ससा दिसल्याने सशाच्या मागे गाडी घेऊन जात असताना जीपच्या दरवाज्याचे लॉक निघून दरवाजा उघडल्याने चालत्या जीपमधून गणेश लोंढे हे खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्यावरून जीपची चाक जावून ते गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी शिराढोण येथील सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाली. याप्रकरणी माणिक रावसाहेब कदम यांनी दिलेल्या मयत बबन लोंढे याच्याविरूद्ध शिरोढाण पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम फौजदार कोल्हे हे करीत आहेत.
येरमाळा -: जनावर बांधण्याच्या कारणावरून कु-हाडीच्या पात्याने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथे घडली.
सतिश विठ्ठलराव काळे (वय ४२ वर्षे, रा. तेरखेडा) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर गोकुळ महादेव भगत (रा. तेरखेडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. यातील सतिश काळे हा जनावरे बांधत असताना गोकुळ भगत याने तू माझ्या जागेत तुझी जनावरे का बांधतोस या कारणावरून शिवीगाळ करून हातातील कु-हाडीच्या पात्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद सतिश काळै यांनी येरमाळा पोलीसात दिल्यावरून गोकुळ भगत याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास हवालदार जगताप हे करीत आहेत.