एखादे छोटे गाव असो की खेडेगाव. प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही असतेच. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा तो एकमेव आधार असतो. अशावेळी तेथे गुणवत्तापूर्ण  शिक्षण मिळावे, ही सर्वांचीच अपेक्षा असते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या 1039 शाळांमध्ये       सेमी इंग्रजी माध्यमाचे  वर्ग सुरु करुन ही अपेक्षा पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
               आपले मूल मोठे व्हावे, ही प्रत्येक पालकाची रास्त अपेक्षा. त्यामुळे या स्पर्धेच्या काळात आपल्या मुलाने स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यायोग्य कौशल्य आत्मसात करावे, ही त्यांची इच्छा असते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वळत आहे. हे जाणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेने जुन 2012 मध्ये आपल्या प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी पहिलीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सुरुवात झाली. आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधून चिमुकल्यांचा तोंडून इंग्रजी गाणी ऐकली की, हा निर्णय किती योग्य आहे, याची खात्री पटते. 
                जूनमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय झाला. शाळांतील शिक्षकांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास ,तत्कालीन शिक्षणाधिकारी अरुण व्हटकर आणि त्यांचे सहकारी आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती संजय पाटील- दुधगावकर आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय राबविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नियोजन केले. प्रत्येक शाळातील गरज, तेथील परिस्थिती, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक संख्या लक्षात घेऊन त्यांनी सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शिक्षकांना हा निर्णय पटविणे अवघड गेले. मात्र, या निर्णयामागील भूमिका समजावून घेतल्यानंतर त्यांचा काहीसा असणारा विरोध मावळला. प्रशिक्षणानंतर तर त्यांना या निर्णयाचे महत्वही समजले आणि त्यांनी मनापासून या उपक्रमास प्रतिसाद दिला. केवळ एक-दोन नव्हे तर तब्बल 1039 शाळांमध्ये या सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सुरुवात झाली. 
                विद्यार्थ्यांचे अ..आ..इ..ऐवजी आता ए..बी..सी..डी..चे बोल वर्गात घुमू लागले. जूनमध्ये सुरु झालेला हा उपक्रम किती दिवस चालणार, असा प्रश्नांकित मुद्दाही बाजूला पडला. कारण, नुकतीच कळंब तालुक्यातील अंदोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट दिली, तेव्हा इंग्रजी गाणी, इंग्रजी शब्दांचे पाठांतर अतिशय ओघवत्या शैलीत ही मुले म्हणत होती.  
            शाळेचा परिसर तर अतिशय स्वच्छ, सुंदर. याठिकाणी ही मुले एका वर्गात बसून वन.. टू…ओपन युवर शू.. अशा कविता म्हणत होती. शिक्षकही अतिशय मनापासून या मुलांना इंग्रजी शिकवण्याचा आनंद घेत होते. ही शाळा केवळ प्रातिनिधीक चित्र उभे करत होती. अशा 1039 शाळांमधून मराठी माध्यमाच्या शाळांमधून सेमी इंग्रजीचे धडे देण्यात येत होते. 

             याबाबत जिल्हा परिषेदेचे सभापती तथा उपाध्यक्ष श्री. दुधगावकर यांनी हा निर्णय घेण्यामागील संकल्पना सांगितली. जगाच्या पाठीवर सध्या इंग्रजीची चलती आहे. या स्पर्धेत ग्रामीण भागातील मुले मागे पडू नयेत. त्यांनाही चांगले इंग्रजी यावे हा प्रामाणिक हेतू ठेवून हा यासाठी हा निर्णय राबविण्याचे ठरले, असे सांगितले. बदल्यांची प्रक्रियाही पारदर्शकपणे राबविल्याने शिक्षकांनी मनापासून हा निर्णय स्वीकारला आणि त्याची मनापासून अंमलबजावणी केली. त्यामुळेच शाळेतील वातावरणात मुले समरस होऊन गेली. सध्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव यांनी यामागील भूमिका समजावून सांगितली. शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याने त्यांनी मनापासून हा निर्णय राबविला.
              याबाबत अंदोरा येथील शाळेतील वर्गशिक्षकांनीही आपले अनुभव सांगितले. सेमी इंग्रजी माध्यमासाठी शैक्षणिक साहित्यनिर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा फायदा झाला. मुलांनाही त्यांच्या घरात, आसपासच्या वातावरणात वापरले जाणारे शब्द इंग्रजीमधून शिकवण्यात आले. त्याचा त्यांना उपयोग झाला. कारण, दररोजच्या वापरातील शब्द शिकणे सोपे गेले. 
             सहज एका मुलाला बोलते केले, तेव्हा त्याच्या तोंडून इंग्रजी शब्दाचे उच्चार, कविता-गाणी ऐकल्या तेव्हा या निर्णयामागची उपयुक्तता पटली. ही एक शाळा प्रातिनिधीक आहे.तेथील मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यांनी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. असेच प्रयत्न  जिल्हा परिषदेच्या 1039 शाळांतून सुरु आहेत. त्याची फलनिष्पत्ती निश्चितच आपल्याला आनंददायी असेल, एवढे नक्की!
  *  दीपक चव्हाण
 
Top