नळदुर्ग -: येथील कुरनूर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पात दिवसेंदिवस पाणीसाठा संपत चालला असून भविष्‍यात पाणीनियोजनाच्‍या दृष्‍टीने दिवाळीनंतर शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्‍यात येणार आहे. त्‍याकरीता नळदुर्ग शहरातील नळ कनेक्‍शन धारकांनी तात्‍काळ पाण्‍याचा अपव्‍यय टाळून पाणी काटकसरीने वापर करावे, नळाना तोट्या बसवून घ्‍यावेत,  ज्‍या नळांना तोट्या नाहीत, त्‍यांचे नळ कनेक्‍शन रद्द करणार असून पाणीटंचाई काळात हयगयी करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करण्‍याचे आदेश दिले आहे. तरी जनतेनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्‍यक्ष नितीन कासार, मुख्‍याधिकारी राजेश जाधव यांनी केले आहे. 
राजेश जाधव 
नळदुर्ग शहराच्‍या पाणीपुरवठ्यावर विचारविनिमय करण्‍यासाठी दि. ५ नोव्‍हेंबर रोजी बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी पाणीपुरवठ्या संदर्भात व भविष्‍यात पाणी पुरवठ्याचे काय नियोजन करण्‍यात आले आहे, याची माहिती मुख्‍याधिकारी राजेश जाधव यांनी दिली. या बैठकीस नगराध्‍यक्ष नितीन कासार, उपनगराध्‍यक्ष शहेबाज काझी, पाणीपुरवठा सभापती मुन्‍वर सुलताना कुरेशी, नगरसेविका सुप्रिया पुराणिक, नगरसेवक संजय बताले, अमृत पुदाले, पाणीपुरवठा विभागप्रमुख डी.एन. कस्‍तुरे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, सुहास येडगे, लतिफ शेख, नेताजी मुळे आदीजण उ‍पस्थित होते.
जाधव यांनी बोलताना सांगितले की, सध्‍या बोरी धरणात उपलब्‍ध पाणीसाठा जानेवारी महिन्‍यापर्यंत पुरेल इतकेच आहे. त्‍यामुळे शहरवासियांनी पाण्‍याचा अतिशय काटकसरीने वापर करणे गरजेचे झाले आहे. सध्‍या शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून दिवाळी सणानंतर शहराला आठवडयातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्‍यात येईल. तसेच बोरी धरणातील पाणीसाठा संपल्‍यानंतर मुरूम (ता. उमरगा) येथील बेनीतुरा प्रकल्‍पातून वीस टँकरद्वारे पाणी आणून नळदुर्गच्‍या जलशुध्‍दीकरण केंद्रात सोडण्‍यात येईल. तेथून   शहराला पाणीपुरवठा करण्‍याचे नियोजन केले आहे. ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील बोरी नदीच्‍या पात्रात दहा ते बारा कूपनलिका घेण्‍याचेही प्रस्‍तावित करण्‍यात आले आहे. 
      पाण्‍याचा अपव्‍यय न करता उपलब्‍ध पाणी काटकसरीने वापरावे, शहरात लवकरच अनाधिकृत नळ कनेक्‍शन तोडण्‍याची मोहीम हाती घेण्‍यात येणार आहे, असे सांगून शहरातील प्रत्‍येक नळ कनेक्‍शन धारकांनी तात्‍काळ नळांना तोट्या बसवून घ्‍यावे,  यापुढे ज्‍या नळाला तोटी दिसणार नाही त्‍यांचे नळ रद्द करण्‍याची कारवाई करण्‍यात येणार आहे. तसेच शहरातील सार्वजनिक नळ व नगरपालिकेच्‍या विंधन विहिरीवरील पाणी टाकीच्‍या नळांना तोटी बसविण्‍याचे आदेश कर्मचा-यांना दिले. पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांनी पाणी पुरवठ्याच्‍या कामात कुठलीच हयगय करू नये, कामात हयगय करणा-या कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचेही मुख्‍याधिकारी राजेश जाधव यांनी सांगितले आहे.
दरम्‍यान पाटबंधारे जलसिंचन शाखा कुरनूर प्रकल्‍पाचे शाखा अभियंता आर.एस. शिंदे यांनी सांगितले की, सध्‍या बोरी धरणात दोन द.ल.घ.मी. एवढा मृत पाणीसाठा आहे. यातील गाळाचे प्रमाण पन्‍नास टक्‍के वजा जाता धरणात फक्‍त एक द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा असून तुळजापूर व नळदुर्ग शहराला हे पाणी जानेवारी अखेरपर्यत पुरेल, असा अंदाज त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
 
Top