सोलापूर : सणासुदीच्या दिवशी दुकानात खरेदी करताना ग्राहकांनी व्यवहारात जागृत राहून खालील बाबींची काळजी घेण्याचे आवाहन वैधमापन कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांनी वस्तु खरेदी करताना दिलेल्या मोबदल्यानुसार वजनात, मापात, संख्येत बरोबरच मिळतील याची खात्री करावी. व्यापा-याने टेबल काटा व स्वयंदर्शी काटयाचे इलेक्ट्रॉनिक्स इंडिकेटर अशारितीने ठेवावा की ग्राहकास वजन करण्याची प्रक्रिया स्पष्टपणे दिसू शकेल. इलेक्ट्रॉनिक्स स्केलच्या इंडिकेटर 00 (शुन्य) असल्याखेरीज त्यावर वजन केले जाणार नाही याकडे लक्ष दयावे शिवाय डिस्प्लेमध्ये 00 (शुन्य) नसल्यास तो 00 (शुन्य) होण्यापर्यंत वजन केले जाणार नाही याची खात्री करावी. मिठाई, ड्राइफ्रुटस, मावा, खवा, इत्यादी खरेदी करतेवेळी त्यांचे वजन खोक्याशिवाय करणे दुकानदारास बंधनकारक आहे. म्हणजेच दुकानदाराने वस्तुंचे निव्वळ वजन करुनच वस्तू खोक्यात टाकाव्यात. पॅकबंद (आवेष्टित) मिठाई, ड्रायफ्रुटस, भेटवस्तू व सजावटीच्या वस्तु इत्यादींच्या आवेष्टनावर वस्तुचे नाव, उत्पादकाचे नांव/ आवेष्टकाचे नांव व संपूर्ण पत्ता, आवेष्टित वस्तुचे निव्वळ वजन/माप/संख्या, विक्रीची किरकोळ किंमत (MRP, Incl of all taxes)उत्पादकाचे / आवेष्टकाचे माहिना व वर्ष, उत्पादकाचे / आवेष्टकाचे/ आयातदाराचे ग्राहक हेल्पलाईन नंबर इत्यादी बाबी घोषित करणे आवश्यक आहे.
ग्राहकांनी वस्तुसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत देवून वस्तु खरेदी करु नये, ग्राहकांनी वस्तुवरील छापील किंमतीमध्ये खाडाखोड आढळल्यास अशी आवेष्ठित वस्तू खरेदी करु नये, या संदर्भात काही गैरवापर आढळून आल्यास नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्, मुंबई यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 022 - 22886666 यावर अथवा dclms complaints @yahoo.co वा वैध मापन शास्त्र विभागाच्या स्थानिक अधिका-याकडे तक्रार नोंदवावी असे सहायक नियंत्रक वजनमापे कार्यालयाने एका पत्रकान्वये कळविले आहे.
