![]() |
गणेश सोनटक्के |
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळकोट (ता. तुळजापूर) या शाखेत जळकोटसह हंगरगा व जळकोटवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा व्यवहार चालतो. याशिवाय ७५0 खातेदार व सातशे कर्जखातेदार या बँकेकडे आहेत. या शाखेत एकूण ५ कोटी ६0 लाख रूपयांच्या ठेवी शेतकर्यांनी ठेवल्या असून, शेतकर्यांना १ कोटी ३0 लाखांचे कर्जही वाटप करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेच्या बहुतांश शाखांत चलन तुटवडा जाणवत असल्याने ग्राहक पुरते वैतागले आहे. त्याचबरोबर कर्मचा-यानाही काम करताना मोठी कसरत करावी लागत असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.
जळकोट शाखेत विविध शासकीय योजनांचे अनुदान मिळविणार्या सुमारे दोनशे निराधार व वृध्द लाभार्थीही जोडण्यात आले आहेत. तहसील कार्यालयाकडून त्यांना या बँकेमार्फत अनुदान दिले जाते. परंतु, तहसीलकडून अनुदान जमा करण्यात येवूनही चलन तुटवड्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना ते मिळत नाही.त्यातूनही शाखाधिकारी एम,जी.वनकुंद्रे यांनी दिवाळी सणासाठी म्हणून प्रत्येक लाभार्थ्यांना पाचशे रूपये वाटप केले होते.
रोजच बँकेत खेटे मारुन त्रस्त झालेल्या या वृध्द लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के यांच्याकडे त्यांची व्यथा मांडली होती.यावर सोनटक्क़े यांनी लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे वाटप करा, अशी विनंती बँक प्रशासनाकडे केली होती.परंतु पैशांचे वाटप होत नसल्याने अखेर लाभार्थी, ग्रामस्थ यांनी सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली मंगवारी या शाखेला टाळे ठोकले. ते शनिवारपर्यंतही कायम होते.
दरम्यान, जोपर्यंत बँकेकडून निराधारांचे पैसे वाटप केले जात नाहीत, तोपर्यंत बँकेचे कुलूप काढण्यात येणार नाही, असे गणेश सोनटक्के यांनी बोलताना सांगितले. याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिका-याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकले नाही.