लोहारा -: संगणकीकरणाच्या युगात पारदर्शी व गतीमान कामकाज होण्याकरीता लोहारा येथील रजिस्ट्री कार्यालयात प्रणाली जोडण्यात आली आहे. त्यामुळे दस्तऐवज प्रक्रिया बुधवार दि. 21 नोव्हेंबर रोजीपासून संगणक प्रणालीद्वारे सुरू करण्यात आले असून याचे उद्घाटन तहसिलदार शशिकांत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. संगणकीकरणामुळे आता जमिनी, प्लॉटींगचे खरेदी-विक्री व्यवहार विनाविलंब जलदगतीने होणार आहे.
लोहारा येथील रजिस्ट्री कार्यालयात कार्यालय सुरू झाल्यापासून येथे मॅन्युअली पद्धतीने जमीन प्लॉटचे दस्तावेजाची नोंदणी केली जात होती. आता रजिस्ट्री कार्यालयात आय सरिता प्रणाली आल्याने ही प्रक्रिया जलद झाली आहे. बुधवारी संगणकाद्वारे प्रथम नोंदविण्यात आलेला मूळ दस्त संबंधित पक्षकारास तहसीलदार गायकवाड यांच्या उपस्थितीत दुय्यम निबंधक सुरेश मंडलिक यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संगणक अभियंता बालाजी राठोड, मुद्रांक विक्रेते शशीकांत जाधव, ज्ञानेश्वर बिराजदार, हेमंत माळवदकर, शिवराज झिंगाडे, रामराव कुलकर्णी, लिपीक विजय माणिकशेट्टी यांच्यासह नागरीक उपस्थिती होती.