स्‍त्रीभ्रूण हत्येस आळा घालण्‍यासाठी शासन स्‍तरावरून विविध उपाय योजना केल्या जात असून गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी घातली गेली. गर्भलिंग निदान करणा-या काही डॉक्टरांना गजाआड व्‍हावे लागले. समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. त्‍यातूनच ‘मुली वाचवा’ हे अभियान सर्वत्र राबविण्‍यात येत आहे. आजवर आपण सर्वत्र मुलाचे नामकरण सोहळ्यानिमित्‍त जंगी कार्यक्रमाने मोठा जल्‍लोष करून साजरा होताना पाहिले आहे. मात्र मुलीच्‍या नामकरणाचा कार्यक्रम उत्‍साहाने साजरा होताना क्‍वचितच पाहिले असेल. परंतू यमगरवाडी (ता. तुळजापूर) प्रकल्‍पातील कार्यकर्ता उमाकांत मिटकर, सौ. प्रणिता मिटकर हे दांम्‍पत्‍य त्‍यास अपवाद ठरले आहे. त्‍यांच्‍या पोटी जन्‍म घेतलेल्‍या अवघ्‍या दीड महिन्‍याच्‍या कन्‍यारत्‍नाचे नामकरण समारंभाचे औचित्‍य साधून ‘मुली वाचवा’ हा शुभ संदेश निमंत्रण पत्रिकेच्‍या माध्‍यमातून नातेवाईक, मित्रांना देऊन समाज प्रबोधन करण्‍याचा त्‍यांचा आगळावेगळा प्रयत्‍न निश्‍चितच कौतुकास्‍पद आहे. त्‍यांचा हा आदर्श इतराना प्रेरणा देणारा असाच आहे.
             पुरोगामी आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपणा-या महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्येचे वाढते आणि मुलींचे घटते प्रमाण ही अत्‍यंत चिंतेची बाब आहे. एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारा समाज याच तंत्रज्ञानाचा वापर गर्भलिंग निदानासाठी करत असून त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येचे गुन्हे वाढीस लागल्‍याचे सर्वश्रूत आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण तुलनेने सधन आणि साक्षरतेचे प्रमाण जास्त असलेल्या भागातच अधिक असल्याने समाजप्रबोधनाची नितांत गरज असल्याने अलीकडच्‍या काळात स्‍त्रीभ्रूण हत्‍येविरूद्ध समाजात जाणीव जागृती करण्‍यात येत आहे.
             तुळजापूर तालुक्‍यातील यमगरवाडी सेवा प्रकल्‍पाचे कार्यकर्ते उमाकांत मिटकर व त्‍यांच्‍या सुविद्या पत्‍नी प्रणिता मिटकर याना दि. 21 सप्‍टेंबर 2012 रोजी गौरी पूजनाच्‍या दिवशी कन्‍यारत्‍नचा जन्‍म झाला.  त्‍यानी आपणही वेगळ्या त-हेने समाजात जाणीव जागृती करावे, या हेतूने त्‍यांच्‍या कन्‍यारत्‍नचा नामकरण समारंभ सोहळा मोठ्या जल्‍लोषात साजरा करण्‍याचे ठरविले आहे. त्‍याप्रमाणे गुरूवार दि. 29 नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता नामकरण समारंभ आयोजित केले आहे. या कार्यक्रमास उ‍पस्थित राहणा-या प्रमुख पाहुण्‍यासाठी प्रिती भोजनाचीही व्‍यवस्‍था केली आहे.
             उमाकांत मिटकर यांनी बोलताना सांगितले की, गर्भलिंग निदान हा शब्‍द मनाला खाऊ लागतो, या अनुषंगाने येणा-या बातम्‍या आपल्‍या मनास सुन्‍न करतात आणि म्‍हणुनच माझ्या मुलीच्‍या नामकरण समारंभ निमित्‍त नि‍मंत्रणपत्रिका काढून ‘मुली वाचवा’ हा शुभसंदेश देण्‍याचे योग्‍य माध्‍यम दुसरे नाही. आपल्‍याला या निमंत्रण पत्रिकेच्‍या माध्‍यमातून ‘मुली वाचवा, गर्भलिंगनिदान’ करू नका एवढा संदेश देवून ही केवळ निमंत्रण पत्रिका नव्‍हे, तर स्त्रित्‍वाची सन्‍मान पत्रिका आहे, सृजनशक्तिीची भावार्चना आहे, मातृशक्‍तीचा स्‍वाभिमान आहे, कुलदेवी, कुलस्‍वामिनी, श्री महालक्ष्‍मी, श्री महासरस्‍वती, श्री महाकाली आदींच्‍या भक्‍तीचं अनन्‍यसाधारण महत्‍त्‍व आपल्‍या जीवनी, पण गर्भलिंग निदान करताना आपण करतो का हा विचार? या सर्व होत स्‍त्रीत्‍वाच्‍या आद्य रूपीणी, असे सांगून इतिहासाची पाने ज्‍यांच्‍या कार्यकर्तृत्‍वानं झालीत सोनेरी, त्‍या मां जीजाऊ, अहिल्‍यादेवी, झांशीची राणी....! आठवुन राहते उभी नजरेसमोर शौर्याची परंपरा अपार, ‘गर्भलिंगनिदानाचा विचार झाला असता त्‍यासमयी..... मिळाले असते का महाराष्‍ट्राचे आराध्‍य राजे शिवछत्रपती’, क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुलेंनी स्‍त्री शिक्षणाची रचली कोनशिला यातुनच निर्माण झाल्‍या लता, ऐश्‍वर्या अन् कल्‍पना चावला पाहून 21 व्‍या शतकातल्‍या नारी विश्‍व घेतय उत्‍तुंग भरारी तेंव्‍हा सुजाण, सज्‍जनहो गर्भलिंग निदानाचा विचार का करावा? आपल्‍या मुलीच्‍या नजरेतच जगज्‍जेती होण्‍याचा स्‍वप्‍न जागवा....! असे आवाहन पत्रिकेद्वारे केले आहे.
 
Top