दिवाळी हा प्रकाशाचा सण असून सर्वजण उत्‍साहाने हा सण साजरा करण्‍याची तयारी करीत असल्‍याचे लगबग सर्वत्र दिसत आहे. दिवाळीतील फटाक्‍याच्‍या आतिषबाजीमुळे ध्‍वनी व वायू प्रदूषणात अलीकडच्‍या काळात दिवसेंदिवस वाढ होत असल्‍याचे दिसत आहे. परिवर्तन ही विकासाची नांदी म्‍हटले जाते. आता मात्र बदलत्‍या काळानुसार आपणही तुळजापूर लाईव्‍ह समवेत ई फटाके फोडून प्रदुषणमुक्‍त दिवाळी साजरी करा, त्‍याकरीता वाचकानी www.tuljapurlive.com वाचत राहा.
तुळजापूर लाईव्‍ह समवेत ई फटाके आपल्‍या संगणक, लॅपटॉपवर उडवून आपला आनंद द्विगुणित करावा, ई फटाक्‍याची संगणकावर आतिषबाजीची संकल्‍पना मुंबईचे संगणक तज्ञ आशुतोष चौधरी यांनी मोठ्या कल्‍पतेने तयार करून तुळजापूर लाईव्‍हच्‍या वाचकाना दिवाळीची एक आगळी वेगळी भेट दिली आहे.
               फटाक्‍याच्‍या आतिषबाजीने आनंदात विरजण घालणारे प्रदूषण व त्‍यापासून मानवी जीवनावर होणारे गंभीर परिणाम तसेच विविध आजार याविषयीच्‍या घटनांचा आढावा खास 'तुळजापूर लाईव्‍ह' च्‍या वाचकासाठी देत आहोत.
बाजारपेठेत कपड्यांच्‍या जाहिरातीची फलके, फराळांच्‍या जाहिराती, दूध, तूप, दही इत्‍यादीच्‍या वेगवेगळ्या कंपन्‍यांच्‍या फलकांची रंगीबेरंगी रांग, वर्तमानपत्रात प्रत्‍येक पानावर दिवाळी हा शब्‍द येत आहे.   कर्मचारी बोनसची चर्चा करीत आहे . शेतकरी रब्‍बीची पेरणी दिवाळीच्‍या अगोदर किती दिवस झाल्‍याची चर्चा,  खरीपाच्‍या जीवावर या वर्षीच्‍या दिवाळीचा  हिशोब इत्‍यादीमधून दिवाळीची चाहुल लागते. दिवाळीचे पदार्पण होणार यामुळे शालेय विद्यार्थी परीक्षा कधी संपते व सुट्यावर कधी जातो याचे हिशोब घालतात. एकंदर दिवाळीच्‍या आगमनाने प्रत्‍येकाला आनंद वाटतो.
'दिवाळी' म्‍हणजे दीपोत्‍सव सर्व सणांचा राजा सण. अबालवृध्‍दांच्‍या आनंदाचा सण. दिवाळीत धन, आरोग्‍य, ज्ञान, संपत्‍ती आणि शांती यासाठी लक्ष्‍मीची पूजा करतात. व्‍यापा-यांचा वार्षिक हिशोब दिवाळीपासून दिवाळीपर्यंत असतो. लक्ष्‍मीपूजनाच्‍या दिवशी संपूर्ण दुकानाची पूजा करतात. गोडधोड वाटून लक्ष्‍मीची आराधना करतात. दिवाळी म्‍हणजे दिव्‍यांचा सण, या दिव्‍याच्‍या सणाला घरातील लहान थोरासहीत नवीन वस्‍त्र परीधान करतात. घरात मिठाई होते. वेगवेगळ्या फराळाच्‍या पदार्थांची रेलचेल असते. पाहुण्‍यांची वर्दळही असते. सासरहून माहेरपणाला मुली येतात. बाहेरगावी नोकरीला असलेले लोक आपल्‍या मूळ गावी येतात.
लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत या सणात शोभेची दारू, फटाके उडवितात. दिवाळी ही कृष्‍ण पक्षात असल्‍यामुळे रात्री अंधा-या असतात. अमावस्‍येच्‍या रात्री लोक उंच आकाशात रॉकेट उडवितात. हे रॉकेट उंचावर जावून फुटतात व त्‍यातून सप्‍तरंगी प्रकाश बाहेर पडतो. त्‍याला पाहून सर्वजण टाळ्या पिटतात. अशी शोभेची दारू उडविण्‍याची जणू शर्यतच लागते. असा कार्यक्रम सलग एक आठवडा चालतो. एकंदर दिवाळी आनंदात येते व जाते.
पर्यावरण संशोधक डॉ. मोहन बाबरे यांच्‍या मते, हवा व ध्‍वनी प्रदूषणामुळे दिवाळीतील अपूर्व आनंद देणारे फटाके जीवघेण्‍या ठरत आहेत. फुलबाज्‍यापासून रॉकेटपर्यंत कोणताही फटाका उडविताना हे दोन प्रदूषण होतात. फटाका उडाल्‍यानंतर जो मोठा आवाज होतो. त्‍या आवाजामुळे ध्‍वनी प्रदूषण होते व फटाका जळताना जो धूर हवेत मिसळतो. त्‍यामुळे हवेचे प्रदूषण होते. हवा व ध्‍वनी हे दोन प्रदूषण एकाच वेळी होतात. हे दोन प्रदूषण एकत्रितपणे करणा-या फटाक्‍यांना आनंददायी म्‍हणायचे काय? असा प्रश्‍न पडतो.
फटाक्‍यामध्‍ये अनेक विषारी पदार्थ असतात. ज्‍वलन सहाय्यक, ज्‍वलनशील आणि ज्‍वालाग्रही घटक फटाक्‍यात असतात. उदा. तांबे, कॅडमियम, शिसे, गंधक, मॅगनीज, मॅग्‍नेशिअम, फास्‍फरस, नायट्राईट, जस्‍त इत्‍यादी. यात कॅडमियम 2 मिलिग्रॅम (100 मिलीग्रॅमला), शिसे 482 मिलीग्रॅम इतके असते.
फटाक्‍यामुळे श्‍वसनाचे विकार, दमा, ह्दयविकार, फुफ्फुसाचे विकार यासारखे आजार होतात.  मानवी आरोग्‍यावर फार मोठे परिणाम फटाके करतात. याकडे कोणीही लक्ष देत नाही. दिवसेंदिवस ही समस्‍या अधिकाधिक तीव्र होत आहे.
फटाक्‍यात असणारे घटक व त्‍याचे मानवी आरोग्‍यावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.
शिसे : ही फटाक्‍यात अत्‍यंत घातक घटक आहे. याच्‍यापासून जो धूर हवेत मिसळतो त्‍याचे श्‍वसन झाले तर फुफ्फुसाचा कर्करोग होतो. लहान मुले मतिमंद होतात. याचा परिणाम मज्‍जारज्‍जूवरही होत असल्‍याचे पुढे आले आहे.
मॅग्‍नेशिअम : या रसायनाचा परिणाम मानवी त्‍वचेवर होती. याच्‍यामुळे त्‍वचा विकार बळावतो.
जस्‍त : जस्‍ताचाही परिणाम त्‍वचेवर होतो व परिणामी त्‍वचारोग जडतो. याचा परिणाम फुफ्फुसावरही होतो.
नायट्रेट : याचाही परिणाम मानवी आरोग्‍यावर होतो. याच्‍या सानिध्‍याने उलटया, जुलाब होतात. अतिसारही           
संभवतो.
नायट्राईट : या रसायनाने उलटया होतात.
तांबे : तांब्‍यामुळे त्‍वचेवर परिणाम होऊन त्‍वचारोग होतो. याचा परिणाम मेंदूसारख्‍या नाजूक व महत्‍त्‍वाच्‍या रोगावर होतो.
कॅडमियम : या महत्‍त्‍वाच्‍या पदार्थाचा परिणाम मुत्रपिंडावर होतो.
मॅगेनीज : याच्‍यामुळे मानवाला निद्रानाशाला सामोरे जावे लागते. निद्रानाशामुळे इतरही गंभीर आजार संभवतात.
फॉस्‍फरस :  याचा परिणाम डोळ्यांसारख्‍या नाजूक भागावर होतो. या रसायनाचा परिणाम मज्‍जातंतूवरही होतो.
गंधक : गंधकाचा परिणाम त्‍वचेवर होतो. त्‍यामुळे त्‍वचाविकार होतात.

उपरोक्‍त रसायने व त्‍याचे मानवी आरोग्‍यावर होणारे परिणाम याचा गंभीरपणे विचार केल्‍यास दिवाळीत उडविले जाणारे फटाके मानवी आरोग्‍यावर किती परिणाम करतात हे स्‍पष्‍टपणे जाणवते. फटाक्‍याचा आवाज तीव्र असल्‍याने तो आवाज सातत्‍याने ऐकल्‍यास कर्णबधिरता येण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. लहान मुले, गर्भवती महिला, ज्‍येष्‍ठ नागरीक यांना याचा त्रास अधिक होतो. या सर्वांचा एकंदर पर्यावरणावर परिणाम होत आहे. यामुळे अलीकडे दिवाळी फटाके मुक्‍त कशी करता येईल, याचा विचार होऊ लागला आहे. 'फटाक्‍या विना दिवाळी' कल्‍पना पुढे येऊ लागली आहे. ही कल्‍पना मूर्त स्‍वरूपात येणे कठीण आहे, पण थोडीशी मानसिकता व मोठे प्रयत्‍न यामुळे हे करता येईल. फटाक्‍याविना दिवाळी हे पचनी पडणे अवघड आहे, पण अशक्‍य मात्र नाही. बहुतेक सर्व घरात फटाक्‍यासाठी पैसे खर्च केले जातात. या पैशाची बचतही होईल.
दिवाळीत होणारे पर्यावरणाचे प्रदूषण टाळणे काळाची गरज आहे. या काळात वायू व ध्‍वनी प्रदूषण होते. वायू प्रदूषण व ध्‍वनी प्रदूषण टाळून आपल्‍याला पर्यावरणाचे रक्षण करता येईल. 'फटाक्‍याविना दिवाळी' साठी स्‍वतःपासून सुरूवात करून पर्यावरण संरक्षणात सहभागी होऊया. 
          फटाक्‍याविना दिवाळीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा आपणास देऊन या दिवाळीत तुळजापूर लाईव्‍ह समवेत ई फटाके यांची आतिषबाजी करून आपला आनंद द्विगुणित करावा !!!
 
Top