नळदुर्ग -: शेतात पाणी देत असताना शेतकर्यास त्याच्या सख्ख्या चुलत भावानी शेत जमिनीच्या वादातून चाकू व जंबियाने सपासप वार करुन जागीच ठार मारल्याची घटना घडली आहे. ही घटना सिंदगाव (ता. तुळजापूर) शिवारात दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. अन्य तिघे फरार झाले आहेत.
शरणाप्पा विश्वनाथ पाटील (वय ४८ वर्षे, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर) असे खून झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. तर बाबुराव श्रीमंत पाटील, संग्राम श्रीमंत पाटील, दत्तात्रय शंकर तांबोळी, चेतन रमेश परशेट्टी (सर्व रा. सिंदगाव, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. यातील मयत शरणाप्पा पाटील यांची तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव शिवारात शेती आहे. ते नेहमीप्रमाणे शेतात मंगळवार रोजी गेले होते. शेतातील पिकाना पाणी देण्यासाठी पाण्याची मोटार चालू करीत असताना बाबुराव पाटील, संग्राम पाटील, दत्तात्रय तांबोळी, चेतन परशेट्टी यांनी संगनमत करुन जंबिया व चाकूने शरणाप्पा पाटील याच्या मानेवर, डोक्यात, गळ्यावर सपासप वार केले. या अनपेक्षित हल्ल्यात शरणाप्पा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होवून जमिनीवर कोसळले व जागीच मरण पावले. ही घटना वार्यासह सिंदगाव व परिसरात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. त्यानंतर सर्वत्र मोबाईल फोन खणखणू लागले आणि ही घटना सर्वत्र पसरली. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक बी.यु. भांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे-वालवलकर, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख, हवालदार बी.बी. घोडके, पोकॉ पतंगे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलीसानी घटनास्थळाचे पंचनामा करुन मृतदेहाचे जळकोट (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. निलंगेकर यानी शवविच्छेदन करण्यात केले. त्यानंतर सिंदगाव येथे बुधवार रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणावर नागरीक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेची नळदुर्ग पोलीस ठाण्यात चनाप्पा विश्वनाथ पाटील (वय ४० वर्षे, रा. सिंदगाव) यानी पोलीसात फिर्याद दिल्यावरुन वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख हे करीत आहेत.