मुंबई -: जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी अथवा  निवडश्रेणी अनुज्ञेय होण्यासाठी उमेदवाराची प्रशिक्षण अर्हतेसह 12 वर्षांची नियमित अर्हताकारी सेवा होणे आवश्यक आहे. ही तरतूद विचारात घेता, कर्मचाऱ्यांने 12 वर्षाच्या कालावधीत वरिष्ठ अथवा निवड श्रेणीची अर्हता प्राप्त केल्यास त्याला नियमित सेवेची 12 वर्षे झाल्याच्या दिनांकाला अथवा वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणीसाठी आवश्यक असलेली अर्हता प्राप्त केल्याच्या दिनांकापासून वरिष्ठ श्रेणी अथवा निवड श्रेणी देय राहील. हा शासन निर्णय 12 ऑक्टोबर 2012 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
                     वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करताना काही प्रकरणांमध्ये प्राथमिक शिक्षकाने पदवीधर बी. एड. ही अर्हता धारण केल्याच्या दिनांकापासून 12 वर्षे मोजल्यामुळे नियमित सेवेच्या 12 वर्षांच्या काळात त्या शिक्षकाने पदवीधर बी. एड. अथवा बी. पी. एड. अर्हता प्राप्त करुनही त्यास 12 वर्षांची वरिष्ठ वेतनश्रेणी दिली जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्याच्या प्रकरणात लेखा परीक्षकांनी वरीलप्रमाणे हरकत घेऊन त्यांना देण्यात आलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी रकमेच्या वसुलीचे आदेश दिल्याचेही शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.

 
Top