भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीस विशेष  महत्व आहे.  आता दिवाळी, मोहरम व ख्रिसमस या महत्त्वाच्या सणासुदीचे दिवस सुरु होत आहेत.  या दिवसात विशेषत: मिठाई, डायफ्रूटस्, सजावटीच्या, शोभेच्या वस्तू, फटाके आदींची  मोठ्या प्रमाणात खरेदी होते.  या काळात आपली फसवणूक होवू नये म्हणून ग्राहकांनीच खरेदी करताना जागरुक राहून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. 

ग्राहकांचे हक्क

* सुरक्षिततेचा हक्क 
जीवित किंवा मालमत्तेला धोकादायक अशा वस्तूंच्या वापरापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क ग्राहकाला आहे. उदा. भेसळयुक्त पदार्थ, बनावटी, मुदत बाह्य झालेली औषधे, बनावटी विद्युत उपकरणे आदी 

* माहिती मिळविण्याचा हक्क
आपण जी वस्तू खरेदी करतो तिच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे. उदा. खरेदी करण्यात येणाऱ्या मालाची प्रत, वजन, शुध्दता, तीव्रता, उत्पादकाचे नाव, उत्पादनाचा महिना, वाटपाची मुदत आदी.

* निवडीचा हक्क
स्पर्धेच्या युगात योग्य किंमतीत आपल्या वस्तूची निवड करण्याचा हक्क ग्राहकाला आहे. ग्राहकांनी दक्ष राहून वस्तूच्या किंमती व गुणवत्ता यांचा विचार करुनच योग्य वस्तूची खरेदी करावी.

* तक्रार निवारणाचा हक्क
वस्तूच्या खरेदीनंतर काही दोष आढळल्यास, हलक्या प्रतिची निकृष्ट वस्तू मिळाली किंवा भेसळयुक्त मिठाई असल्याचा संशय आल्यास किंवा खरेदीत फसवणूक झाली असे वाटत असल्यास ग्राहकाला त्या संबंधी ग्राहक न्यायालयात  तक्रार करण्याचा अधिकार आहे.

* ग्राहक शिक्षणाचा हक्क
बाजारपेठेची व व्यापारी व्यवहाराची ग्राहकाला माहिती असणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत.

* आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क
सुदृढ जीवन जगण्यासाठी ग्राहकाला प्रदूषणापासून संरक्षण मिळवण्याचा हक्क आहे. याबरोबरच प्रामाणिकता मिळवण्याचा, मतप्रदर्शन करण्याचा ग्राहकांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क ही ग्राहकाला आहे. 

* ग्राहकांची कर्तव्ये व जबाबदा-या
ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना दिलेल्या मोबदल्यानुसार वजनात, मापात संख्येत बरोबरच मिळतील याची खात्री करुन घ्यावी. 
वजन काटा व स्वयंदर्शी काट्याचे इलेक्ट्रॉनिक्स इंडिकेटर याद्वारे केलेले वजन अचूक असल्याची खात्री करावी.. इलेक्ट्रॉनिक्स स्केलच्या इंडिकेटरवर 00 (शून्य) असल्याखेरीज त्यावर वजन केले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.  मिठाई, ड्रायफुट्स, मावा, खवा इत्यादी खरेदी करतेवेळी त्यांचे वजन खोक्याशिवाय करणे दुकानदारास बंधनकारक आहे, याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.
पॅकबंद मिठाई, डायफ्रूटस्, भेटवस्तू व सजावटीच्या वस्तू इत्यादींच्या आवेष्टनावर वस्तूचे नाव, उत्पादकाचे आवेष्टकाचे किंवा आयातदाराचे नाव व संपूर्ण पत्ता, आवेस्टित  वस्तूचे निव्वळ वजन, माप, संख्या, विक्रीची किरकोळ किंमत, उत्पादनाचा महिना वर्ष तसेच उत्पादकाचा,  आवेष्टकाचा  किंवा आयातदाराचा ग्राहक हेल्पलाईन नंबर इत्यादी बाबी घोषित करणे आवश्यक आहे. त्या बाबींचा उल्लेख केला आहे की नाही हे ग्राहकांनी तपासून घ्यावे.  तसेच ग्राहकांनी वस्तूसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत देवून वस्तू खरेदी करु नये.  वस्तूवरील छापील किंमतीमध्ये खाडाखोड आढळल्यास अशी आवेष्टित वस्तू खरेदी करु नये व या संदर्भात काही गैरप्रकार आढळून आल्यास नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 022-22886666 यावर अथवा dclmms complaints @yahoo.com या ईमेल पत्त्यावर किंवा वैधमापनशास्त्र विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी.
ग्राहक व संरक्षण विभागांतर्गत राज्यातील ग्राहकांच्या तक्रारी निवारण्याकरिता तसेच त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करण्याकरिता राज्य शासनाने कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने राज्य ग्राहक हेल्पलाईन 15 सप्टेंबर 2011 पासून कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 1800 222262 असा आहे. या क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क साधावा.

* विकास माळी (उपसंपादक)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
 
Top