नळदुर्ग -: भरधाव कारची मोटारसायकला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून अपघातग्रस्त कारमधून १८ किलो गांजा आढळला आहे. अपघातानंतर गांजाची वाहतूक करणारा चालक फरार झाला असून हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात रविवार रोजी सकाळी साडे आठ वाजता झाला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम.एच. १२ पीए. ९३७० ही कार उमरग्याहून सोलापूरकडे भरधाव वेगाने जात असताना जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात बोरमण तांडाजवळ समोरुन येणा-या मोटारसायकल (क्रं. एम.एच. १३ एस. ८२७०) यास जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार दुभते वय ४० वर्षे, (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. किलज, ता. तुळजापूर हा जखमी झाला आहे. अपघातानंतर कारचालक पसार झाला असून या कारमध्ये १८ किलो गांजा किंमत ३६ हजार रुपये व कारची किंमत १ लाख रुपये असे मिळून १ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केले. या घटनेची फिर्याद हवालदार बब्रुवान बाबुराव घोडके यांनी पोलीसात दिली. पुढील तपास दुय्यम फौजदार प्रकाश गायकवाड हे करीत आहेत.
 
Top