उस्मानाबाद :- आगामी काळात पाणी आणि पीकनियोजनाला सर्वाधिक महत्व असून त्यासाठी स्वतंत्र
जलसंधारणाची व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. निधीची कमतरता हा महत्वाचा विषय नसून
त्यासाठी सर्वांची कृतीशील मानसिकता गरजेची आहे. उस्मानाबादकरांनी ही मानसिकता दाखवली तर
संभाव्य जलसंकटाचा आपण मुकाबला करु शकतो,असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प
समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी केले.
उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातील नागरीक, लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांसाठी पाणीबचत व
नियोजनाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी
आज येथील शुभमंगल कार्यालयात पाण्याचा वापर, बचत व रोजगार निर्मीती नियोजन
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी मार्गदर्श्न
करताना पवार बोलत होते. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, पंचायत समिती सभापती श्रीमती प्रेमलता लोखंडे
यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. के.एम.नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरीदास आदिंची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती
होती.
पवार यांनी यावेळी पाणीबचत आणि पीकनियोजनाबाबत स्वत:च्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीने केलेल्या
प्रयत्नांची माहिती दिली.सध्या अतिउपसा झाल्यामुळे जमिनीतील पाणी
पातळी सातत्याने घटत आहे. त्यामुळे पाणी व पीक नियोजनाची सर्वाधिक गरज निर्माण झाली
आहे. येत्या ३ ते ४ वर्षात त्याबाबतचे
नियोजन आपण करु शकलो नाही तर सिंचनाचे प्रश्न निर्माण होतील अशी भीती त्यांनी
व्यक्त केली.
सध्या राज्याच्या विविध भागात पाण्याच्या समस्या निर्माण
झाल्या आहेत, त्याचा उल्लेख करुन पवार यांनी पाण्यामुळे वाद निर्माण होवू नये हे वाटत असेल
तर हे प्रश्न एकत्रितरित्या सोडविणे आणि त्यासाठी राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर
पाणी हा विषय असणे गरजेचे आहे,असे सांगितले.
गुणवत्तापूर्ण कामे करुन घेणे ही जबाबदारी गावकऱ्यांची असून
विविध योजनातून होणाऱ्या कामांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
ग्रामसभांच्या
माध्यमातून प्रश्न सोडविणे आणि त्यात सर्वांचा सहभाग घेणे महत्वाचे आहे.
सध्या केंद्र शासनाच्या
ग्रामविकास विभागामार्फत ग्रामविकासासाठी ९० हजार कोटी रुपयांची तरतूद आहे.
आपण निधीचा योग्य
विनियोग करण्यात कमी पडतो,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नियोजन केले तर कोणतेही
गाव दोन ते तीन वर्षात बदलू शकते हे हिवरे बाजारच्या अनुभवावरुन सांगता येईल.
विदर्भातील काही
गावानीही अशी प्रगती साधली आहे. मात्र त्यासाठी विकासाची मानसिकता महत्वाची आहे.
आसपासचे डोंगर,टेकड्या हिरव्यागार करण्याची जबाबदारी ही
सर्वांवर आहे असे श्री. पवार यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी हिवरे बाजारची प्रगती ही सामुहिक प्रयत्नांमुळे झाल्याचे आवर्जून
सांगितले. शेतीसाठी ठिबक सिंचनचा वापर, ऊस आणि केळीसारख्या अतीपाणी आवश्यक असणाऱ्या पीकांना बंदी,
ग्रामसभांच्या
माध्यमातून लोकसहभाग आणि गावातील प्रत्येकावर सोपवून दिलेली जबाबदारी यामुळे हिवरे
बाजारचा आदर्श गाव म्हणून नावलौकिक झाला, असे
पवार यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ. पाटील यांनी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले. आ. निंबाळकर यांनी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने
पाणी वापर कमी होवून सिंचनक्षेत्र वाढते असे सांगितले. स्वत:च्या शेतात आपण ठिबकचा वापर केल्याचा फायदा
झाल्याचे व इतर शेतक-यांनीही याचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. व्हट्टे यांनी पाणी हा ज्वलंत प्रश्न असून
नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल,
असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ.
नागरगोजे यांनी केले.
यावेळी त्यांनी
जिल्ह्यातील पाण्याबाबतची सध्यस्थिती उपस्थितांच्या लक्षात आणून दिली.
आगामी काही महिन्यात
जिल्ह्याला संभाव्य जलसंकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्वांनी पाणी जपून वापरावे व इतरांना
त्यासाठी प्रवृत्त करावे,असे आवाहन केले. पाणी साठा लक्षात घेवून पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे,असे त्यांनी सांगितले.
यावेळी सादरीकरणाच्या
माध्यमातून पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणाऱ्या दोन चित्रफिती दाखविण्यात
आल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे झाडाचे रोपटे देवून
स्वागत करण्यात आले. आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब वानखेडे यांनी मानले. या कार्यशाळेस दोनही
तालुक्यातील पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती
सदस्य,सरपंच,तलाठी,ग्रामसेवक तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.